
मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत भाजपचे नवे ‘शंकरशेठ’, कला उपासक श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मतदानाचा हक्क बजावला. मुंबईतील सर्वच मराठी संस्थांना ग्रहण लागले आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयापासून ते आझाद मैदानावरील मुंबई मराठी पत्रकार संघापर्यंत सर्वच संस्थांच्या जमिनीवर बिल्डरांना पाय ठेवायचे आहेत.
मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे महान ‘कला उपासक’ व फडणवीस सरकारचे ‘नाना शंकरशेठ’ मंगलप्रभात लोढा हे मतदान करीत असल्याचे छायाचित्र दै. ‘लोकसत्ता’ने छापले. महाराष्ट्रातील सर्वच मराठी वृत्तपत्रांनी भाजपच्या आधुनिक शंकरशेठचे हे चित्र पहिल्या पानावर छापून एक मथळा द्यायला हवा होता, तो म्हणजे ‘मुंबईचे बिल्डर आता साहित्य संघाचाही घास घेणार काय?’ गिरगावातील साहित्य संघ ही साहित्य, कला, संस्कृतीच्या दृष्टीने अस्सल मराठी संस्था. मुंबई शहर आणि उपनगरांत मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. अमृत नारायण भालेराव यांनी 1935 मध्ये साहित्य संघ स्थापन केला. मराठी कला, रंगभूमीचा सुवर्णकाळ या संघाने पाहिला. मात्र आता त्या संघाचा ताबा घेण्यासाठी पंचवार्षिक निवडणुकीत 600 मतांचा घोटाळा केला गेला. डुप्लिकेट मतदान पत्रिका छापून वितरित करण्यात आल्या. ठेकेदार व इतर लोकांनी साहित्य संघाच्या मतदानात सहभाग घेतला, हा संशय खरा ठरला तर भाजपच्या ’शंकरशेठ’ना साहित्य संघावर ताबा मिळवून तेथे ‘टॉवर्स’ उभे करायचे आहेत हे सिद्ध होईल. त्याआधी लोकशाही मार्गाचा देखावा करून या मंडळींना मराठी माणसांच्या इतर अनेक संस्था व संस्थांच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आहेत हे समजून घेतले पाहिजे.
जमिनी कोणाकडे?
मंगलप्रभात लोढा व गौतम अदानी यांच्याकडे मुंबईतील सर्वाधिक जमिनी आज आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय बिल्डर ‘कंबोज’ यांना मुंबईतील सर्वाधिक आणि मोक्याच्या जागेवरचे एसआरए प्रकल्प मिळाल्याची माहिती मुंबई काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांत सर्व परप्रांतीय बिल्डर शिरले व ते सर्व भाजप व त्यांच्या नेत्यांचे अप्रत्यक्ष खजिनदार आहेत. महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली. त्या मुंबईचे ‘लोढाकरण’ आणि ‘कंबोजीकरण’ झाले, असे भाजपचेच नेते खासगीत बोलत असतात. अदानी त्या सगळ्यांच्या वर आहेत. मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेत आला. साहित्य संघ ताब्यात घेण्याप्रमाणेच मुंबई मराठी माणसांच्या संदर्भातील इतर संस्था भविष्यात ताब्यात घेतल्या जातील. त्यात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ही ऐतिहासिक संस्था व संस्थेच्या जमिनीवर बिल्डरांचे लक्ष आहे. साहित्य संघाप्रमाणे लोकशाही मार्गाने ही संस्था ताब्यात घ्यायची व तिच्या जमिनीवर टॉवर्स उभे करायचे ही योजना भाजपपुरस्कृत बिल्डरांच्या डोक्यात तयार आहे. मुंबईची शान असलेल्या ‘बेस्ट’च्या पतपेढीची निवडणूक या वेळी गाजली. या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत ‘बेस्ट’ कामगार सेनेचा पराभव करण्यासाठी बिल्डर लॉबी सक्रिय झाली. ‘बेस्ट’चे कर्मचारी यात मतदान करतात व मुंबईतील सर्व बेस्ट डेपो त्यात सहभागी होतात. एकंदरीत साडेबारा हजार मतदान झाले होते. त्यात शशांक राव पॅनलला 3,800 मते मिळाली. अचानक निवडणुकीत घुसलेल्या भाजपच्या प्रसाद लाड पॅनलला 3500 आणि शिवसेनेच्या सुहास सामंत यांच्या पॅनलला 2500 मते मिळाली. 1800 मतदार अवैध ठरविण्यात आले. अपक्षांना प्रचंड पैसे देऊन उभे केले गेले व त्यांच्यासाठी 1000 मते विकत घेण्याची व्यवस्था केली गेली. भाजपला ‘बेस्ट’मध्ये घुसण्याची इतकी घाई का? यावर पुन्हा बिल्डरांकडेच बोट दाखवले जाते. मुंबईत ‘बेस्ट डेपो’ची प्रचंड जमीन आहे. ती मोक्याच्या जागी आहे. पडझड अवस्थेत असलेल्या या सर्व डेपोंच्या पुनर्निर्माणात आपला सहभाग हवा, असे बिल्डर प्रसाद लाड यांना वाटले व त्यांनी मराठी मतदारांत फूट पाडण्यासाठी प्रचंड पैसा या निवडणुकीत ओतला. पाच-पाच हजारांना गरीब कर्मचाऱ्यांची मते विकत घेतली. मुंबईतील साहित्य संघापासून बेस्ट पतपेढीच्या साध्या निवडणुकीपर्यंत हे सर्रास सुरू आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाची इमारत आझाद मैदानात मोक्याच्या जागी आहे. त्या भूखंडावरही याच बिल्डरांचा डोळा गेला आहे. उद्या शिवाजी मंदिर, मराठा मंदिरसारख्या संस्थांच्या जमिनीही या पद्धतीने गिळंकृत होतील. मराठी माणूस व मराठी संस्कृतीचा एकही स्तंभ टिकवायचा नाही हे एकंदरीत विद्यमान राज्यकर्त्यांचे धोरण आहे. साहित्य संघापासून अनेक संस्था बिल्डर ताब्यात घेत आहेत, पण मुंबईच्या मरीन लाईन्सच्या समुद्रकिनाऱ्यावरील ‘ग्रॅण्ट मेडिकल क्लब’ जैन समाजाच्या संस्थेने लोकशाही मार्गाने ताब्यात घेतला. त्यामागे मोठा आर्थिक व्यवहार आहे. मंगलप्रभात लोढा यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. साहित्य संघात लोढा यांनी मतदानाचा अधिकार प्राप्त केला. तसा अधिकार या नव्या जैन क्लबमध्ये मराठी लोकांना मिळणार आहे काय? मुंबईतील कबुतरखान्यांना आधी न्यायालयाने व नंतर मराठी संघटनांनी विरोध केला. तो विरोध पोलीस बळाचा वापर करून मोडला व श्री. लोढा यांनी सरकारी तिजोरीतला पैसा वापरून बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये नवा कबुतरखाना निर्माण केला. हे जरा अतीच झाले. त्यापेक्षा या कबुतरप्रेमींनी मरीन लाईन्सच्या समुद्र किनाऱ्यावरील त्यांच्या नव्या आलिशान क्लबच्या हिरवळीवर कबुतरखाना का उघडला नाही!
राणे काय म्हणतात?
मराठी भाषा, संस्कृतीचे शत्रू मराठीच्याच घरात आहेत व सध्या ते भाजपच्या घरात आहेत. बराच काळ शिवसेनेत राहिलेले व शिवसेनेने मोठे केलेले नारायण राणे आता भाजपमध्ये आहेत. श्री. राणे यांनी अलीकडे एक वक्तव्य केले. राणे सरळ म्हणतात, “मुंबई ही काही मराठी माणसांनी निर्माण केलेली नाही. मुंबई बहुरंगी आहे. मुंबईतील उद्योगधंदे, बाजारपेठा वगैरेंत मराठी माणसाचे योगदान नाही.” राणे हे आता भाजपमधील धनिक शेठजींची भाषा वापरत आहेत व मुंबई घडविणाऱ्या श्रीमंत नाना जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी लाड यांच्यासारख्या मराठी जनांच्या कर्तृत्वाचा अपमान करीत आहेत. मुंबई मराठी माणसाच्या रक्तातून, घामातून उभी राहिली. त्याच रक्तातून शिवसेना निर्माण झाली व त्याच शिवसेनेमुळे आजचे नारायण राणे निर्माण झाले. एकनाथ शिंदे वगैरे लोकांचे जनकत्व शिवसेनेकडेच जाते. हे राणे यांच्यासारख्यांनी समजून घेतले पाहिजे. शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले काही मंत्री दक्षिण मुंबईतील 72 व्या मजल्यावर राहतात याचे श्रेय ते कोणाला देणार? पण या बदल्यात मुंबईतील मराठी माणसांच्या सांस्कृतिक संस्थांच्या गळ्याला नख लावले जात आहे. मुंबई हे सर्वच दृष्टीने महाराष्ट्राचे केंद्र आहे. महाराष्ट्राच्या कला, साहित्याचे आश्रयस्थान मुंबई हेच आहे. मराठी नाट्य कलेची उपासना रंगभूमीच्या आजच्या पडत्या काळातही मुंबई इतकी महाराष्ट्रात अन्यत्र कोठेच होत नसेल. मुंबईतील मराठी संस्कृतीचे ‘लोढाकरण’, ‘कंबोजीकरण’ जे लोक करू इच्छितात त्यांनी पक्के ध्यानात ठेवले पाहिजे की, मराठी रंगभूमी व इतर कलांना मुंबईनेच प्रथमपासून वाढवले. डॉ. भाऊ दाजी लाड आपल्या घरी नाटकांची तिकिटे विकत असत. गंधर्व नाटक मंडळीचे मुंबई हेच मुख्य ठाणे होते. पेंढारकरांची ललितकलादर्श मुंबईतच वाढली. रंगभूमीवरचे नवनवे प्रयोग मुंबईनेच केले. मुंबईतील उच्च न्यायालयात मराठी लोकांची महान परंपरा आहे. मुंबई न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश जनार्दन वासुदेवजी होते. तेलंग, रानडे, चंदावरकर, माडगावकर, बावडेकर, पाटकर, राजाध्यक्ष, गोखले, गजेंद्रगडकर, तेंडोलकर अशी ही परंपरा आहे. मुंबईची रॉयल एशियाटिक सोसायटीदेखील मराठी विद्वानांची एक परंपराच दाखवते. शिल्प, चित्र या कलांमध्येही मराठी प्रतिभा सदैव तळपत राहिली. महाराष्ट्राचे मन मुंबईकडे सदैव धाव घेत असते. मुंबईशिवाय महाराष्ट्राचे जीवन व्यर्थ आहे. मुंबईशिवाय महाराष्ट्र जगूच शकणार नाही म्हणून मुंबईवर घाव घालून मराठी मन नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जाता जाता ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी 18 फेब्रुवारी 1928 रोजी पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर केलेले भाषण व त्यातील मराठीबाबत मांडलेले विचार देतो.
केतकर म्हणतात,
“मला संदेश म्हणून विशेष सांगावयाजोगे काही नाही. मला काही सांगावयाची गोष्ट असेल तर ती ही की, आपल्या पुढच्या आयुष्पामात मराठी वाङ्मयास अपकर्षक होईल असे सरकार तुम्ही टिकू देऊ नये. आपण ज्या लोकांच्या हाती राज्यसूत्रे देणार ती मंडळी मराठी वाङ्मयास उत्तेजन देतील अशा प्रकारचीच असली पाहिजे, अशी खबरदारी घ्या. सुशिक्षितांनी जंगली सरकार सहन करता कामा नये. वाङ्मयप्रेमी आणि भाषाप्रेमी लोकांनी जे सरकार वा जी राज्यपद्धती आपल्या भाषेस अपकर्षक होईल ती टिकू देता कामा नयेत. मराठी भाषेत महाराष्ट्राचा राज्यकारभार चालणे यालाच मी स्वराज्य समजतो. जो कायदा मराठीत मांडला नाही, तो कायदा महाराष्ट्रास बंधनकारक नाही. महाराष्ट्राचा जो गव्हर्नर असेल त्याची सहीदेखील मराठीत नसली तर ती बेकायदेशीर व्हावी आणि मुख्य न्यायाधीशांपासून खालच्या न्यायाधीशांच्या निवाड्याची भाषा मराठीच असली पाहिजे, या प्रकारचे कायदे तुम्ही लवकरच मंजूर करून घ्या. देशी भाषेत राज्य चालविणारे सरकार जितके लवकर स्थापित होईल, तितके लवकर स्थापित करा. हे जर तुमच्या पिढीने केले तरच तुमच्या पिढीने कर्तव्य बजाविले असे होईल, एरवी होणार नाही.”
आता महाराष्ट्राचे नवे शंकरशेठ विचारतील, “कोण हे केतकर? आम्ही त्यांना ओळखत नाही!”
सर्वच मराठी संस्थांचा साहित्य संघ होताना दिसतोय. हे थांबविणारे कोणीच नाही काय?
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]