
>> धीरज कुलकर्णी
विविध भाषांतील भारतीय लेखिका, त्यांना गवसलेले आत्मभान, त्यांचा जीवनप्रवास, साहित्यप्रवास समजून घेत त्यांच्या लेखनाचा समजलेला, उमजलेला स्वर… या नव्या सदरातून.
आज ओळख करून घेऊया ‘ब्लू नेक्ड ब्रह्मदत्त’ या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेल्या ज्येष्ठ लेखिका इंदिरा गोस्वामी यांची.
ठसठशीत मोठी लाल टिकली, तिच्या दोन्ही बाजूला धनुष्याकृती कोरलेल्या भुवया, भेदक डोळे आणि या सर्वांना छेद देणारे एक प्रेमळ, निर्मळ सुहास्य. मी पाहतच राहिलो त्या आजीबाईंकडे.
2000 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता तिला. पेपरमध्ये मोठा फोटो आणि पुरवणीत तिच्याबद्दल लेख आलेला. फोटोत ती तिच्या लिहिण्याच्या टेबलाशी बसलेली. टेबलवर एक तलवार आडवी ठेवलेली होती. मला भारी कुतूहल वाटलं म्हणून तलवार बाळगणाऱया त्या लेखिकेबद्दल नीट वाचून काढलं. त्या होत्या महान आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी. ‘ब्लू नेक्ड ब्रह्मदत्त’ ही कादंबरी व एकूण साहित्य सेवा यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
मामोनी रायसोमी गोस्वामी या नावाने परिचित असणाऱया इंदिरा गोस्वामी यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1942 रोजी गुवाहाटी इथे झाला. अंबिका देवी आणि उमाकांत गोस्वामी या वैष्णव ब्राह्मण दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. हे कुटुंब एकसरण पंथाचे अनुयायी होते.
जन्म झाल्यानंतर तिच्या पालकांना ज्योतिषाने सांगितले की, ही मुलगी वाईट मुहूर्तावर जन्मलीय, तिचे तुकडे करून ब्रह्मपुत्रेत फेकून द्या, तर ग्रहशांतीसाठी कामरूपमधल्या कामाख्या देवीच्या मंदिरात एका बोकडाच्या पिलाचा बळी देण्यात आला. ते दृश्य लहानग्या इंदिरेच्या मनावर आघात करून गेले. पुढे अनेक वर्षे त्यांनी कामाख्या देवी मंदिरात दिल्या जाणाऱया बळी प्रथेविरोधात आवाज उठवला.
ही अशी बंडखोर, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी लेखिका. लहानपणापासून लिहित्या झालेल्या इंदिरा गोस्वामी यांनी आसामी भाषेत विपुल लेखन केले. शालेय शिक्षणानंतर इंदिरा यांनी आसामी साहित्य या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 1956 पासून लेखन सुरू करून 1962 ला त्यांचा पहिला कथासंग्रह ‘चिनाकी मोरोम’ प्रकाशित झाला.
1965 ला त्यांचा विवाह माधवन अय्यंगार या अभियंत्याशी झाला. मात्र लग्नानंतर केवळ दीड वर्षांत पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर त्या नैराश्याने ग्रस्त झाल्या. झोपेच्या गोळ्यांचा मोठा डोस त्यांना घ्यावा लागे. त्यातच काही व्यसनेसुद्धा त्यांना जडली. आत्महत्येचा प्रयत्नही त्यांनी काही वेळा केला. या सर्वांतून फार प्रयत्नपूर्वक त्या बाहेर आल्या आणि पुन्हा नव्याने लेखनाला सुरुवात केली. एके ठिकाणी त्या म्हणतात, लेखन ही एकच गोष्ट आहे जिने त्यांना जिवंत ठेवलं. पतीबरोबर त्याच्या नोकरीच्या निमित्ताने त्या मध्य प्रदेश, कश्मीर या राज्यांमध्ये राहिल्या होत्या. त्या ठिकाणचे अनुभव त्यांनी कथालेखनात मांडले.
गोलपारा इथे शिक्षक म्हणून काम करताना आणि नंतर वृंदावनमध्ये विधवांच्या समस्यांबद्दल संशोधन करताना त्यांना मिळालेले अनुभव लेखणीबद्ध झाले. वृंदावनमधील विधवा स्त्रियांचे होणारे शोषण आणि तिथले खरे रूप यावर त्यांनी 1976 साली ‘ब्लू नेक्ड ब्रह्मदत्त’ ही कादंबरी लिहिली. आजही ही कादंबरी भारतीय साहित्यात अभिजात म्हणून गणली जाते. तिथल्या विधवांची स्थिती पाहूनच की कोण जाणे, इंदिरा यांनी ठसठशीत कुंकू लावायला सुरुवात केली. हीसुद्धा एक प्रकारची बंडखोरीच. वृंदावनमध्ये असतानाच त्यांनी तुलसीदासांचे रामायण आणि आसामी रामायण यांच्या तौलनिक अभ्यासावर एक पुस्तकही लिहिले. कुणाच्याही लेखनाचे अनुकरण न करता, स्वतची स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली.
इंदिरा गोस्वामी यांनी लेखनाला सुरुवात केली तो काळ भारताच्या नवनिर्माणाचा होता. त्या काळात शिक्षणाचे प्रमाण अल्प आणि सामाजिक समस्या मोठय़ा होत्या. अशा वेळी त्यांच्या लेखणीने समाजातील गरीब, अशिक्षित लोकांना स्वतचा आवाज दिला. प्रेम, भावना, धर्म आणि मानवी जीवन यांची एक सुरेख गुंफण त्यांच्या कादंबऱयांमध्ये वाचायला मिळते. साधी सोपी व गुंतागुंत नसलेली शब्दरचना, सामान्य माणसाच्या आयुष्यातील नेहमी घडणाऱया घटना, रचना, मांडणीचे कौशल्य यामुळे अल्पावधीतच त्यांचे लेखन लोकप्रिय झाले.
समाजातील समस्या नेमकेपणाने पाहून त्यावर त्यांनी फक्त लेखनच केले नाही, तर स्वत कृतीतून काही करता येऊ शकते हेही दाखवून दिले. आसाममधील उल्फा अतिरेकी व सरकार यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण होण्यासाठी त्यांनी मध्यस्थ म्हणून दीर्घकाळ भूमिका बजावली.
‘मॉथ इटन हौदा ऑफ टस्कर’ या त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘अदाह्य (adaरब्a)’ हा चित्रपट बनला. तसेच सुप्रसिद्ध आसामी दिग्दर्शक जानू बरूआ यांनी इंदिरा गोस्वामी यांच्यावर एक माहितीपट बनवला. या दोन्ही कलाकृती रसिकांना आज यूटय़ूबवर उपलब्ध आहेत. त्यांची ‘छिन्नमस्ता’ ही कादंबरी व ‘अर्धीमुर्धी कहाणी’ हे आत्मचरित्र मराठीत अनुवादित झाले आहेत. अर्थात इतक्या ताकदीच्या लेखिकेची इतरही पुस्तके मराठीत आली तर वाचकांना नक्कीच आनंद होईल.