
>> राहुल गोखले
आधुनिक तंत्रज्ञान, बदलती व गतिमान जीवनशैली, मनोरंजनाचे नवनवीन पर्याय या सगळ्यांचा परिणाम म्हणून मूल्य व्यवस्था ढासळत चालली आहे का? हा चिंता वाटणारा प्रश्न नेहमी उपस्थित होत असतो. मार्तंड औघडे यांनी ‘बीज अंकुरे अंकुरे’ या पुस्तकातील ललित लेखांमधून या समस्यांचा वेध घेतानाच मूल्य व्यवस्था कशा महत्त्वाच्या आहेत यावर भाष्य केले आहे. या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणजे या लेखांत लेखकाने अगदी रोजच्या आयुष्यातील प्रसंग-घटनांचा उल्लेख आपल्या प्रतिपादनाच्या पुष्टय़र्थ केला आहे. मात्र त्यातून लेखक जे सांगू इच्छितो ते मोलाचे आहे.
प्रस्तुत पुस्तकात पंचवीस छोटेखानी लेख आहेत. ‘तेरे मेरे सपने’ चित्रपटातील जे गाणे तीस-चाळीस वादकांच्या चमूने ध्वनिमुद्रित करण्याचे ठरले होते ते अचानक उद्भवलेल्या अडचणीमुळे केवळ पाच जणांच्या चमूने कसे पूर्ण केले हे नमूद करून लेखकाने आपल्या ध्येयापर्यंत पोचू इच्छिणाऱयाने तक्रारीचा सूर लावून सबब शोधणे बंद केले पाहिजे असे ‘ठरवलंच आहे तर’ या तसेच ‘काठिण्य पातळी’ या लेखांत लेखकाने सुचविले आहे. शाळेच्या तुलनेत महाविद्यालयात स्वातंत्र्य असले तरी शालेय जीवनात जे संस्कार झाले त्यांची स्वतहून सिद्ध करण्याची प्रयोगशाळा म्हणजे महाविद्यालय होय असे लेखक ‘विद्यालय आणि महाविद्यालय’ लेखात विशद करतो. त्याच लेखात लेखकाने मूल्यसंस्कार म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. लेखक म्हणतो, ‘गैरवर्तन करण्याची पूर्ण संधी असतानाही जी आंतरिक प्रेरक शक्ती आपल्याला गैरवर्तन करण्यापासून रोखते आणि सन्मार्गावरून विचलित होऊ देत नाही त्यालाच मूल्यसंस्कार म्हणतात.’ ही व्याख्या चपखल अशीच म्हटली पाहिजे. अवघड परीक्षेला सामोरे जाण्यास घाबरून टाळाटाळ करू नका अशी सूचना लेखक ‘कधीच हार मानू नये’ लेखात करतो आणि ते करताना आपल्या स्वानुभवाचा दाखला देतो. भौतिक व बौद्धिक संपदा महत्त्वाची असली तरी मानसिक संपत्ती श्रेष्ठ असा दावा करताना लेखक विंदा करंदीकर यांच्या कवितेतील ‘कर विचार, हास रगड’ या काव्यपंक्तीचा नेमका उल्लेख करतो.
मुलांना जपावे, त्यांना सुखसोयी द्याव्यात, पण त्या नादात आपल्या पाल्याला पालकांनी व्यवहारज्ञानापासून दूर ठेवावे का, असा सवाल उपस्थित करतानाच असे करणे घातक असल्याचा इशारा लेखक ‘बीज अंकुरे अंकुरे’ या लेखात देतो. पूर्वी लहान-लहान गोष्टींत समाधान असे, ज्यांतून विद्यार्थी समृद्ध होत असत त्या समाधानाला व समृद्ध होण्याच्या प्रक्रियेला आताची पिढी पारखी होत आहे का असे प्रश्न लेखक ‘गोष्ट’, ‘पहिला पगार’, ‘श्रेय’ इत्यादी लेखांतून विचारतो. अर्थात लेखकाने लावलेला सूर नकारात्मक नसून त्याचा हेतू केवळ धोक्याचा इशारा देण्याचा आहे. त्यामुळेच ‘थोडं कौतुक करूया तरुणाईचं’सारख्या लेखात लेखकाने विषम आणि आव्हानात्मक परिस्थिती आजूबाजूला असतानाही तरुण झुंज देत असल्याचे कौतुकही केले आहे. ‘श्यामची आई ः एक जीवनचिंतन’ हा लेख आवर्जून उल्लेख करावा असा. जीवनशैली बदलली तरी जीवनमूल्ये शाश्वत असतात याचे स्मरण या लेखातून लेखक नेमकेपणाने करून देतो. आपल्या कन्येच्या हट्टापायी का होईना, पण थेट लता मंगेशकर, उषा मंगेशकर यांची त्यांच्या निवासस्थानी कशी भेट झाली याचा हृद्य अनुभव सांगणारा लेख मोठय़ा माणसांच्या विनम्रतेचे दर्शन घडविणारा.
लेखक शिक्षक असल्याने तरुण पिढीशी त्याचा अगदी निकटचा व नित्य संबंध आहे. नव्या पिढीतील गुणदोषांचा प्रत्यय लेखकाला येत असतो. साहजिकच त्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने जीवनमूल्यांच्या घसरणीवर चिंता व चिंतन या लेखांत उमटले आहे. लेखकाची निवेदनशैली प्रसन्न असल्याने लेखांची खुमारी वाढली आहे. श्रीकृष्ण ढोरे यांनी तयार केलेले मुखपृष्ठ वेधक.
बीज अंकुरे अंकुरे
लेखक ः मार्तंड औघडे
प्रकाशक ः नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
पृष्ठे ः 128; ह मूल्य ः रुपये 240