अमेरिकेत जाणं महागलं; ‘एच-1बी’ व्हिसासाठी मोजावे लागणार 88 लाख, ट्रम्प यांच्या निर्णयानं हिंदुस्थानींना झटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने ‘एच-1 बी’ व्हिसासाठी नवीन अटी लागू केल्या आहेत. ‘एच-1 बी’ व्हिसा मिळवण्यासाठी आता प्रतिवर्षी 1 लाख डॉलर (जवळपास 88 लाख रुपये) खर्च करावे लागणार आहेत. ट्रम्प यांनी शनिवारी व्हाईट हाऊसमध्ये या आदेशावर स्वाक्षरी केली. पूर्वी एच- 1 बी व्हिसासाठी अर्ज शुल्क 1 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत होते.

ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना बसणार आहे. कारण ‘एच-1 बी’ व्हिसाचा सर्वाधिक फायदा हिंदुस्थानींनीच घेतलेला आहे. मात्र आता ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे हा व्हिसा घेऊन अमेरिकेत जाण्याचे आणि तिथे काम करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार हे स्पष्ट आहे.

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून व्हिसासंबंधी नियम अधिकाधिक जाचक होऊ लागलेले आहेत. अमेरिकेत येणाऱ्या आणि जाणाऱ्यांनाही जाचक चौकशीला, विविध अर्ज प्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यात आता ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारी एच-1 बी व्हिसासाठी नवीन अटी लादल्या आहेत. त्यानुसार एच-1 बी व्हिसा मिळवण्यासाठी आता 1 लाख डॉलर खर्च करावे लागणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे अमेरिकन कंपन्यांना सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे ट्रम्प म्हणाले.

एच-1 बी व्हिसा घेऊन अमेरिकेत जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक आकडा हिंदुस्थानी नागरिकांचा आहे. अमेरिकेने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार एच-1 बी व्हिसा मिळवणाऱ्यांमध्ये 71 टक्के हिंदुस्थानी असून 11.7 टक्के चिनी नागरिक आहेत. आता व्हिसा मिळवण्यासाठी 88 लाख मोजावे लागणार असल्याने हिंदुस्थान आणि चीनच्या नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.

साधारण एच-1 बी व्हिसा 3 ते 6 वर्षांसाठी दिला जातो. अमेरिका दरवर्षी जवळपास 85 हजार एच-1 बी व्हिसा देते. यासाठी लॉटरी पद्धतीचा वापर केला जातो. विविध कंपन्या यासाठी अर्ज करत असतात. यंदाच्या वर्षी सर्वाधिक एमेझॉन कंपनीला 10 हजार व्हिसा मंजूर झाले असून त्यानंतर टाटा कन्सटेन्सी, मायक्रोसॉफ्ट, अॅपल आणि गूगलचा नंबर आहे.

विरोधात बातम्या देणारी चॅनल्स बंद होऊ शकतात! ट्रम्प याची उघड धमकी