
>> मेधा पालकर
शिक्षण ही केवळ संधी नाही, तर समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. सामाजिक विषमता, गरिबी, अज्ञान, लैंगिक भेदभाव यांसारख्या अनेक समस्यांवर शिक्षण हेच प्रभावी उत्तर ठरू शकते. आज गरज आहे ती अशा सकारात्मक उदाहरणांची, जी समाजाला प्रेरणा देतील. त्यामुळे या सदरातून आम्ही अशा कार्यकर्त्यांचा आणि विद्यार्थ्यांचा मागोवा घेणार आहोत, जे शिक्षणाच्या माध्यमातून नवा प्रकाश पेरत आहेत, समाजात आदर्श ठरत आहेत.
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर ज्ञान, कौशल्ये, मूल्ये आणि जीवन जगण्याच्या सवयी आत्मसात करण्याची एक निरंतर प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया व्यक्तीला अधिक सजग, सक्षम आणि जबाबदार बनवते. घरातील संस्कारांपासून ते शाळेतील शिक्षणापर्यंत आणि पुढे आयुष्यभर चालणाऱया शिकण्याच्या वाटचालीत शिक्षणाचे स्थान अनन्यसाधारण आहे. आजच्या आधुनिक काळात शिक्षणाची व्याप्ती केवळ शाळा-कॉलेजांपुरती मर्यादित राहिलेली नाही. डिजिटल माध्यमे, ऑनलाइन शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (Aघ्) अशा आधुनिक साधनांमुळे शिक्षण अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक झाले आहे.
भारत सरकारने तयार केलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (ऱझिं् 2020) हे याच दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. बालवयातील शिक्षण आणि संगोपन, मुलांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, शालेय आणि उच्च शिक्षण या सर्व पैलूंना यात महत्त्व देण्यात आले आहे. या बदलांमुळे शिक्षण ही एक आजीवन प्रक्रिया बनली आहे.
शहरी भागातील महापालिका शाळांपासून ते ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांपर्यंत आजही अनेक शिक्षक अत्यंत समर्पणाने विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. शिक्षणाच्या पारंपरिक धोपट मार्गापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणारे अनेक विद्यार्थी आज दिसून येतात. अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांना दिशा देणाऱया संस्था, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱया मुलांसाठी अनेक दानशूर संस्था पुढे येतात. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून हे कार्य करणाऱया अशा व्यक्ती आणि संस्थांनी आज शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली आहे. या सदराच्या माध्यमातून अशाच काही विद्यार्थ्यांची, संस्था आणि व्यक्तींची ओळख करून देणार आहोत, ज्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात विशेष कामगिरी बजावली आहे. गावागावांत, राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱयात आपली छाप सोडणाऱया या लोकांचे अनुभव, त्यांची धडपड, त्यांचे कौशल्य आणि त्यांची प्रेरणादायी कहाणी आमच्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.