दसऱ्याच्या तोंडावर शेतीचा शिमगा होऊन बसला असताना कृषीमंत्री आहेत कुठे? अंबादास दानवे यांचा सवाल

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. वादळी वारे, मुसळधार पाऊस यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहेत. शेतातील उभ्या पिकांचा चिखल होत असल्याने शेतकरी आक्रोश करतोय, पण त्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत असताना सरकार निवडणुकीत गुंतले असून कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरही फिरकलेले नाहीत. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी समाचार घेत महायुती सरकारवर हल्ला चढवला.

अंबादास दानवे यांनी शनिवारी सकाळी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. या ट्विटसोबत एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे. याच मुसळधार पावसामुळे शेतीतील माती वाहून गेल्याचे दिसत असून सोयाबीन, मूग, उडीद पिकांचाही पार चिखल झाल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत अंबादास दानवे यांनी, दसऱ्याच्या तोंडावर शेतीचा शिमगा होऊन बसला असताना राज्याचे कृषीमंत्री आहेत कुठे? असा सवाल केला आहे.

राज्यातील साधारण ४५०० गावे आणि लाखो हेक्टरची शेती अक्षरशः पाण्यात गेली. हे अगदी कालचे धारशिवच्या वाशीतील चित्र. पण सरकारला अजून जाग आलेली नाही. मुक्तीसंग्राम दिनी ‘लवकरात लवकर’ मदत करण्याचे चॉकलेट साक्षात ‘देवा’कडून मिळाले. पण मदत मिळेल तेव्हा खरं. शेतकऱ्यांचे धैर्य खचू नये म्हणून तातडीने मदत होणे आवश्यक आहे, हे सरकारला समजायला हवे. नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करू, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.