संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा पुढील वर्षी उघडणार; बांधकाम ठेकेदार आणि महापालिकेच्या बैठकीत नाट्यकर्मांना आश्वासन

संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आणि त्यांच्याच नावाने असलेल्या नाट्यगृहाचे पुनर्बंधकाम एका वर्षात केशवराव भोसले यांच्या जयंतीदिवशी खुले होणार होते. पण एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या प्रवृत्तीमुळे दिरंगाईचा फटका बसला आहे. अखेर संबंधित बांधकाम ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत आता पुढील वर्षी नाट्यकर्मीदिनी दि.27 मार्च रोजी या नाट्यगृहाचा पडदा उघडण्याचे आश्वासन नाट्यकर्मीना देण्यात आले. तसेच, यापुढे कामकाजाचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेण्याचेही ठरले.

लोकराजा राजीं छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक कला, क्रीडांना राजाश्रय दिला. त्यातूनच कलाकारांसाठी पॅलेस थिएटर साकारले. याचेच पुढे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नामांतर झाले. पण गेल्या वर्षों ८ ऑगस्ट रोजी रात्री
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच अचानक या नाट्यगृहाला आग लागून ते भस्मसात झाले. त्यामुळे कोल्हापूरकरांसह समस्त चित्रपट आणि नाट्यसृष्टी हळहळली. लोकभावना पाहाता राज्य सरकारलाही या नाट्यगृहाच्या पुनर्बाधणीसाठी पुढाकार घ्यावा लागला. होते तसेच नाट्यगृहाचे बांधकाम व्हावे, अशी सर्वांची मागणी होती. शिवाय वर्षभरातच हे नाट्यगृह पूर्ववत उभे करून, केशव भोसले यांच्या जयंती दिवशीच सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. पण ज्या पद्धतीने पोलीस तपासात आग लागली की कोणी लावली, याचे कारण स्पष्ट झाले नाही, तसेच निधीची उपलब्धता असतानाही दिलेल्या मुदतीत या नाट्यगृहाची पुनर्बाधणी अपूर्णच राहिली. यामध्ये संबंधित बांधकाम ठेकेदारासह प्रशासनाचा समन्वय आणि नियोजन नसल्याने अनेक तांत्रिक चुका होत असल्याचे समोर येऊ लागले. त्यामुळे पुन्हा एकदा कलाकारांमध्ये रोष दिसून आला.

जळीत मलबा काढणे, विम्याच्या रकमेतील अडथळा, लॅब रिपोर्ट यामधील विलंब तसेच दगडी भिंती मजबूत करण्यात गेलेला वेळ, छताचे चुकलेले स्ट्रक्चर अशा सातत्याने कामांतील दिरंगाईमुळे गेल्या आठवड्यात कलाकारांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर मंगळवारी नाट्यगृहाच्या परिसरातच बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, आर्किटेक्ट चेतन रायकर, बांधकाम ठेकेदार वि. के. पाटील, सहायक अभियंता सुरेश पाटील, कलाकार आनंद काळे, करणसिंह चव्हाण, सुनील घोरपडे, सुनील माने, संजय मोहिते आदी कलाकार उपस्थित होते.

गेल्या कित्येक महिन्यांपासून या कामाच्या डिझाईनची मागणी करण्यात येऊनही ती दिली नाही. त्यामुळे नाट्यगृहातील छताचे काम, जिना आदी कामांबाबत कलाकारांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी अंतिम आराखडा समोर येताच, त्यातील काही कामे परस्पर बदलल्याचे लक्षात आले. त्यावरून कलाकारांनी कोणाच्या सांगण्यावरून हे बदल केले? असा सवाल करत, संबंधित सल्लागार आणि ठेकेदारांना धारेवर धरले. यावेळी नाट्यगृहात खुच्यांची संख्या पूर्ववत वाढवा. कलादालनाकडे जाणाऱ्या जिन्याचे नूतनीकरण करा, यांसह कामाचा विलंब पाहाता निदान पुढील वर्षी नाट्यकर्मीदिनी तरी काम पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली.

चौथ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू
पहिल्या टप्प्यातील 95 टक्के, दुसऱ्या टप्प्यातील 50 टक्के काम पूर्ण झाले असून, तिसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. तर, चौथ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सल्लागार कंपनीचे चेतन रायकर यांनी यावेळी सांगितले.