स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी पण..ऑस्ट्रेलियाचा हिंदुस्थानवर मालिकाविजय

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र, तिच्या या ऐतिहासिक कामगिरीला विजयाचा टिळा लागू शकला नाही. या सामन्यात ५० चेंडूंत शतक ठोकत स्मृतीने हिंदुस्थानसाठी वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम केला. या खेळीने तिने विराट कोहलीचा १२ वर्षांचा विक्रम मोडला. कोहलीने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५२ चेंडूंत शतक झळकावले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाने हा सामना ४३ धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ फरकाने बाजी मारली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४७.५ षटकांत ४१२ धावांचा डोंगर उभारला होता. यात बेथ मूनीने ७५ चेंडूंत १३८ धावा करताना २३ चौकार अन् एक षटकार ठोकला. याचबरोबर जॉर्जिया व्होल (८१) व एलिस पेरी (६८) यांनीही अर्धशतके ठोकली. हिंदुस्थानकडून अरुंधती रेड्डीने ३, तर रेणुका सिंग व दीप्ती शर्मा यांनी २-२ फलंदाज बाद केल्या. ऑस्ट्रेलियाच्या ४१२ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना स्मृती मानधनाने ५० चेंडूंत शतक पूर्ण केले. अखेरीस तिने ६३ चेंडूंत १७ चौकार आणि ५ षटकारांसह १२५ धावा केल्या. दीप्ती शर्मा (७२), कर्णधार हरमनप्रीत कौर (५२) व तळाला स्नेह राणा (३८) यांनीही चांगली फलंदाजी केली.

महिला वन डेत दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक

स्मृती मानधनाने महिला वन डे क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम तिच्या नावावर जमा झाला आहे. या यादीत अव्वल स्थानी ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग आहे, जिने २०१२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ४५ चेंडूंत शतक केले होते. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी आहे, जिने यावर्षीच ५७ चेंडूंत शतक झळकावले होते.

हिंदुस्थानी महिला गुलाबी जर्सीत!

हिंदुस्थानी महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या निर्णायक वन डे सामन्यात नेहमीच्या निळ्या जर्सीऐवजी गुलाबी जर्सी परिधान करून खेळला. यामागे बीसीसीआय आणि एसबीआय लाइफ यांची स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करणे ही मोहीम होय. सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत हरमनप्रीत म्हणाली की, ‘आम्ही रोज अनिश्चित परिस्थितीसाठी स्वतःला तयार करत असतो. ही गुलाबी जर्सी आम्हाला आठवण करून देते की, आपण सदैव सज्ज राहायला हवं. चला, स्तनतपासणीला आपल्या मासिक दिनचर्येचा भाग बनवूया आणि कर्करोगाविरोधात उभे राहूया.’