भाजपने ईव्हीएम हॅक केले तर वाईट का वाटते? दिल्लीच्या मुख्यमंत्री बोलता बोलता खरं बोलल्या!

‘‘काँग्रेसवाले 70 वर्षांपासून ईव्हीएम हॅक करत होते ते चालत होते, आम्ही हॅक केले तर त्यांना वाईट वाटतेय,’’ असे म्हणत दिल्लीच्या भाजपच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ईव्हीएम घोटाळ्याची एक प्रकारे कबुलीच दिली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीत भाजपची सरशी झाली आहे. त्याअनुषंगाने त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. भाजप ईव्हीएम हॅक करून, मतचोरी करून निवडणुका जिंकते असा राहुल गांधी यांचा आरोप आहे. याकडे गुप्ता यांचे लक्ष वेधले असता त्या मनातले बोलून गेल्या. ‘‘काँग्रेस जिंकली तर तो जनतेचा विजय आणि भाजप जिंकला तर ईव्हीएम हॅक? हा कुठला फॉर्म्युला आहे,’’ असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी हे जनतेची दिशाभूल करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

केजरीवाल यांचा हल्ला

रेखा गुप्ता यांच्या या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ‘एक्स’वर शेअर केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री काय बोलतायत पाहा, असे त्यांनी म्हटले आहे.