केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोर झालं आहे, GST वरून रोहित पवार यांची टीका

भरमसाठ प्रमाणात GST आकारून केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात महाराष्ट्रातून 20 ते 25 लाख कोटी रुपये कमावले असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोर झालं आहे असेही रोहित पवार म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, आज वृत्तपत्रातल्या या जाहिराती व्यवस्थित बघा. गेली आठ वर्षे किराणा सामान, शार्पनर, वही, पेन यापासून देवाच्या अगरबत्तीपर्यंत, विमा हफ्त्यापासून, औषधे, कपडे-चपला तर शेतीच्या खतांपर्यंत भरमसाठ प्रमाणात GST आकारून केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात जवळपास 110 लाख कोटीहून अधिकचा गल्ला जमवला. त्यात एकट्या महाराष्ट्रातून 20 ते 25 लाख कोटी रुपयांचा वाटा आहे.

गेली आठ वर्षे जीएसटी च्या माध्यमातून सर्वसामान्यांचा खिसा कापला आणि आजपासून खिसा कापणे काही प्रमाणात कमी करण्याच्या या निर्णयाला दिवाळी गिफ्ट, जीएसटी बचतीचा शुभारंभ म्हणणारं केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोर झालं आहे, असंच म्हणावं लागेल.

आज देशात सरकारविरोधातल्या वाढत्या असंतोषामुळे केंद्र सरकारला आपल्याच कर्माची फळं भोगायची वेळ जवळ आल्याची चाहूल लागल्याने तसेच शेजारपाजारची परिस्थिती लक्षात आल्याने जीएसटी दरात सुधारणा करण्याची उपरती झाली…. असो..! उशिरा का होईना, सरकारला जाग आली हे महत्वाचं आहे, त्याबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन!

‘‘जीएसटी सुधारणा हे क्रांतिकारी पाऊल असून वस्तूंच्या किमती कमी होणार, देशांतर्गत मागणी वाढणार’’ असल्याची प्रतिक्रिया देत महागाई वाढल्याने देशांतर्गत मागणी कमी झाली होती हे वास्तव अप्रत्यक्षपणे मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचंही विशेष अभिनंदन…! असेही रोहित पवार म्हणाले.