Latur Rain News – लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा; ऑगस्टमध्ये अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी 244 कोटींची मदत

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जवळपास 2 लाख 87 हजार 151 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. आज राज्य शासनाने लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 3 लक्ष 80 हजार 511 शेतकऱ्यांना 244 कोटी 25 लक्ष रुपयांची मदत जाहीर करून दिलासा दिला आहे.

राज्य शासनाने घोषित केलेली मदतीची रक्कम डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये, यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे निर्देशही शासनाने दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यानुसार लातूर तालुक्यातील 30 हजार 265 शेतकऱ्यांना 21 कोटी 81 लाख 54 हजार रुपये, औसा तालुक्यातील 46 हजार 183 शेतकऱ्यांना 31 कोटी 75 हजार 84 हजार रुपये, रेणापूर तालुक्यातील 45 हजार 778 शेतकऱ्यांना 24 कोटी 72 लक्ष 99 हजार रुपये, निलंगा तालुक्यातील 27 हजार 758 शेतकऱ्यांना 21 कोटी 21 लक्ष 41 हजार रुपये, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 24 हजार 87 शेतकऱ्यांना 16 कोटी 19 लाख 8 हजार रुपये, देवणी तालुक्यातील 26 हजार 974 शेतकऱ्यांना 18 कोटी 99 लक्ष 41 हजार रुपये, उदगीर तालुक्यातील 52 हजार 783 शेतकऱ्यांना 30 कोटी 69 लक्ष 44 हजार रुपये, जळकोट तालुक्यातील 20 हजार 700 रुपये शेतकऱ्यांना 13 कोटी 26 लक्ष 17 हजार रुपये, अहमदपूर तालुक्यातील 57 हजार 737 शेतकऱ्यांना 36 कोटी 46 लक्ष 86 हजार रुपये आणि चाकूर तालुक्यातील 48 हजार 246 शेतकऱ्यांना 29 कोटी 22 लक्ष 30 हजार रुपये रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.