
>>संजय कऱ्हाडे
दावणीला एक कोकरू बांधून ठेवलंय. गळय़ातल्या दोरीतून सुटण्यासाठी धडपड सुरू आहे. जीव मेटाकुटीला आलाय, कारण समोर एक वाघ जिभल्या चाटत भूक लागण्याची वाट पाहत आहे!
कोकराचं नाव बांगलादेश आणि खूंखार वाघाचं नाव सांगण्याची आवश्यकता नसावी! आशिया कप क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानी संघ आतापर्यंत एखाद्या वाघासारखाच खेळलाय. कधी गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या तंत्राचे लचके तोडत त्यांची लोळण उडवली, तर कधी फलंदाजांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मानगुटी पकडून त्यांना सीमारेषेबाहेर भिरकावून दिलं!
मैदानावरील या जंगलात राजासारखा भासतोय तो मात्र अभिषेक शर्मा. आपल्या उजव्या खांद्यावर आलेला शाहीनचा पहिलाच उसळता चेंडू त्याने हलकेच गोंजारल्यासारखा वाटला. पण तो फाईन लेगला षटकार होता! आज अभिषेकने साऱ्या क्रिकेटविश्वातील दिग्गजांना खडबडून जागवलंय. तुम्ही उजवे सचिन-विराट बघितलेत, आता डावरे सचिन-विराट पहा असंच जणू तो सुचवतोय! अजून त्याला अनेकानेक क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या परीक्षा आणि ‘कसोटी’ पास करायच्या आहेत हे मान्य, पण सचिन-विराटनंतर तसंच आक्रित पुन्हा पाहण्याची आम्हाला आस लागली आहे. डोळे कोरडे पडलेत!
वनडेत दुहेरी शतक करणं शक्य आहे असं साधारण वीस वर्षांपूर्वी सेहवाग म्हणाला होता. तेव्हा त्याची हेटाळणी करण्यात आली, पण सात वर्षांनंतर त्याने स्वतः द्विशतक ठोकलं. गंमत म्हणजे, सेहवागचं म्हणणं प्रथम सिद्ध केलं सचिनने. 2010मधल्या त्या शतकानंतर एकूण बारा द्विशतकं झळकली. त्यात रोहितची तीन!
असाच मनमोहक वेडेपणा अभिषेक टी-20मध्ये करू शकतो असं मला वाटतं! मात्र, प्रत्येक सामन्यापूर्वी अभिषेकच्या आईने त्याची दृष्ट काढावी अशी माझी कळकळीची विनंती आहे!
पण बांगलादेशच्या संघाला अगदीच ‘कोकरू’ म्हणता येईल का? सुपर-फोरच्या पहिल्याच सामन्यात त्यांनी सातत्यपूर्ण श्रीलंकेच्या 168 धावांचं आव्हान यशस्वीपणे पेललं होतं. अगदी शेवटच्या क्षणांत त्यांनी छातीची धडकन वाढवली खरी, पण अखेर ते पद्मात न्हायलेच!
अर्थात, धावांसाठी बांगलादेशच्या आशा सैफ, तांझीद, कप्तान लिटनकडून आहेत आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हृदोय आणि शमीम असतील. मात्र त्यांची गाठ पडेल आसुसलेल्या बुमरा, पांडय़ा, कुलदीप आणि कंपनीशी. आणि हिंदुस्थानच्या आक्रमक सैन्याला थोपविण्यासाठी बांगलादेश अनुभवी गोलंदाज मुशफिकुर, तस्किन, शारीफुल, महेदी अन् नव्या दमाच्या नासूमकडून अपेक्षा ठेवेल.
अन्यथा, हात जोडून आकाशाकडे पाहून त्रात्याला आर्जव करणं तर शक्य आहेच!