फिरकीपटूंच्या हाती विजयाची गुरुकिल्ली, हिंदुस्थान-बांगलादेश आज भिडणार

टीम इंडियाने आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर धमाकेदार विजय मिळवत सुपर-4 फेरीची सुरुवात केली. पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर आता बुधवारी (दि. 24) हिंदुस्थानचा सामना बांगलादेश संघाशी होणार आहे. बांगलादेशनेही श्रीलंकेवर विजय मिळवत सुपर-4 फेरीचा सकारात्मक प्रारंभ केलाय. त्यामुळे हिंदुस्थान विरुद्ध बांगलादेश’ सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, या सामन्यात दोन्ही संघांच्या फिरकीपटूंवर साऱ्यांचे लक्ष असेल. कारण दुबईच्या मंद खेळपट्टीवर विजयाची गुरुकिल्ली ही फिरकीपटूंच्या हाती असेल.

फिरकीपटूंवर बांगलादेशची मदार

आकडेवारीवर नजर टाकल्यास अर्थातच हिंदुस्थानचा वरचष्मा स्पष्टपणे दिसतोय. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या 17 टी-20 सामन्यांपैकी बांगलादेशाने फक्त एकाच विजयाची नोंद केली आहे. 2015 विश्वचषकात मेलबर्नमध्ये रोहित शर्माला ‘नॉट आऊट’ दिल्याच्या वादानंतर हिंदुस्थान-बांगलादेश सामन्यांमध्ये नेहमीच तणाव राहिला आहे. कागदोपत्री बांगलादेशचा संघ हिंदुस्थानच्या आसपासही दिसत नाहीये. त्यामुळेच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानचा संघ विजयासाठी दावेदार मानला जात आहे. मात्र, फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर बांगलादेशचे फिरकीपटू दमदार खेळ करून इतिहास बदलवू शकतात. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास हा हिंदुस्थानला आधी फलंदाजीस बोलावून मुस्तफिजूर रहमानसोबत रिशाद हुसैन आणि माहीदी हसन यांच्या फिरकीवर अवलंबून राहील. हिंदुस्थानला 150-160 धावांत रोखले तरच त्यांना विजयाची संधी असेल.

संभाव्य उभय संघ

हिंदुस्थान अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

बांगलादेश सैफ हसन, तंजीद हसन, लिटन दास (कर्णधार व यष्टिरक्षक), तौहीद हृदॉय, शमीम हुसैन, जाकेर अली, मेहदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद, तंजीम हसन, मुस्तफिजूर रहमान.

फलंदाजीत हिंदुस्थानच भारी!

उभय संघांची फिरकी गोलंदाजी तुल्यबळ असली तरी फलंदाजीत मात्र हिंदुस्थानी खेळाडूच भारी आहेत. सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या जबरदस्त फॉर्मात असून, त्याने 210 च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत. शुभमन गिलने पाकिस्तानविरुद्ध 158 च्या स्ट्राइक रेटने धावा कुटल्या. उलट बांगलादेशचे सर्वोत्तम दोन टी-20 फलंदाज लिटन दास (129 स्ट्राइक रेट) आणि तौहीद हृदॉय (124 स्ट्राइक रेट) आकडेवारीत फारसे प्रभावी नाहीत. हिंदुस्थानसाठी थोडीशी चिंता म्हणजे तिलक वर्माचा फिरकीविरुद्धचा खेळ. कारण 2025 मध्ये फिरकीविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट खालावलेला आहे. 2024 मध्येही त्याने 61 चेंडूंवर 116 धावा केल्या, पण डॉट चेंडूंचे प्रमाण 21.3 टक्के होते. त्यामुळे हिंदस्थानचा विजय निश्चित मानला जात असला तरी, बांगलादेशचे फिरकीपटू जर चमकले तर सामना नक्कीच रंगतदार होऊ शकतो.