
‘न्यायाधीशांच्या कामांचेही मूल्यमापन व्हायला हवे. त्यासाठी विशिष्ट मापदंड व मार्गदर्शक तत्त्वे असावीत आणि त्यांचे पालन झाले की नाही हे पाहणारी यंत्रणा असावी,’ असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी व्यक्त केले आहे.
झारखंडमधील एका खून खटल्यात जामिनाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीशांनी हे मत मांडले. ‘अनेक न्यायाधीश असे आहेत जे दिवसरात्र काम करतात. प्रकरणे निकाली काढण्याचा त्यांचा वेगही चांगला आहे. दुर्दैवाने असेही काही न्यायाधीश आहेत ज्यांच्याकडे कामाचा उरक नाही. त्याची कारणे काहीही असतील. माहीत नाही. ते शेवटी परिस्थितीवर अवलंबून असते, मात्र काहीतरी व्यवस्था असणे गरजेचे आहे,’ असे कांत म्हणाले.
‘जामिनाचे प्रकरण फौजदारी प्रकरणांसाठी मापदंड म्हणून वापरले जाऊ शकत नाही, मात्र न्यायाधीशांना त्यांच्यासमोर कोणते काम आहे हे माहीत असले पाहिजे आणि त्यांनी ते पूर्ण केले पाहिजे. ही जनतेची सामान्य अपेक्षा आहे,’ असे न्यायमूर्ती सूर्य कांत म्हणाले.
प्रत्येक न्यायाधीशाने स्व–मूल्यांकन करावे!
‘प्रत्येकाने स्वतःचे मूल्यांकन केले पाहिजे. खटले तुंबू दिले जाऊ नयेत. सुनावणी तहकूब करणे हा उपाय असू शकत नाही. सतत सुनावणी तहकूब करणे हे निराशाजनक आणि धोकादायक ठरू शकते. काही न्यायाधीशांची ओळख सुनावणी तहकूब करणारे अशीच बनली आहे, असेही त्यांनी सांगितले.