
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान सोमवारी (दि. 22) शासनाच्या नियंत्रणाखाली आले. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निर्णयाचे शनि मंदिर परिसरात आज भाविकांकडून, तसेच परिसरातील नागरिकांकडून जोरदार स्वागत करून जल्लोष करण्यात आला. यावेळी मंदिरात अभिषेक करून चौथऱयावर शनिमहाराजांना तैलाभिषेक अर्पण करून पेढेवाटप करण्यात आले. यावेळी ऋषिकेश शेटे, देवीदास साळुंखे, अमोल वांढेकर, दादा घायाळ, साईराम बानकर, देवस्थानचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी उदय बल्लाळ आदींनी राज्य सरकारचे आभार मानले.
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान हे गेल्या आठ-दहा वर्षांपासून वादाचे केंद्रबिंदू ठरले आहे. स्थानिक विश्वस्तांकडून मंदिरात अनियमितता व गैरव्यवहार होत असल्याने येथील कारभाराची चर्चा राज्यभर गाजत होती. शनिभक्तांना अवाच्या सवा दराने पूजासाहित्य, भाविकांनी दिलेल्या दानातून विश्वस्त व कर्मचारी वारेमाप उधळपट्टी करीत असल्याचे अनेक पुरावे चौकशीत दिसून आले. अलीकडे शनिशिंगणापूर देवस्थानच्या नावे बनावट ऍपद्वारे ऑनलाइन पूजा घोटाळा केल्याचे उघड झाले. अवांतर नोकरभरती प्रकरण विधानसभेत गाजले. याबाबत 21 ऑगस्ट 2025च्या दैनिक ‘सामना’मध्ये ‘शनी देवस्थानवर शासनाची वक्रदृष्टी पडणार’ असे वृत्त देण्यात आले होते. आता देवस्थानवर प्रशासक नेमल्यावर हे वृत्त खरे ठरल्याची चर्चा सुरू होती.
शनैश्वर मंदिरात शुकशुकाट
राज्य सरकारने शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केल्याने आज शनैश्वर मंदिरात सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळाला. तसेच 2018नंतर झालेल्या नोकरभरतीचा आकृतिबंध नियम आदींमुळे कर्मचाऱयांमध्ये अस्वस्थता दिसून आली. विद्यमान विश्वस्त मंडळाने मंदिराकडे आज पाठ फिरवल्याचे दिसून आले. शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्याची चर्चा संपूर्ण गावात व परिसरात दिसून आली.