
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांकडून त्यांना एक वाईट टेलिप्रॉम्प्टर आणि एक खराब एस्केलेटर मिळाला आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाच्या दूरवस्थेवरही टीका केली. ही संस्था जगात शांतता प्रयत्नांना मदत करण्यात अपयशी ठरत आहे आणि मुख्यालयाच्या इमारतीची गुणवत्ता आणि दर्जा ढासळल्याचे दिसत आहे.
ट्रम्प यांनी भाषणाला सुरू करताच सांगितले की, आपले टेलीप्रॉम्प्टर काम करत नाही. मला टेलिप्रॉम्प्टरशिवाय हे भाषण करण्यास काही हरकत नाही. महासभेच्या सभागृहातील स्थितीबाबत आपण आनंदी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. जे कोणी हे टेलिप्रॉम्प्टर चालवत आहे ते मोठ्या संकटांना तोंड देत आहेत, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी छापील प्रतीचा आधार घेत संबोधन पूर्ण केले.
संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रचंड क्षमता आहे. मी नेहमीच ते म्हटले आहे. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे. पण ते त्याचा वापर करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. एक खराब एस्केलेटर आणि एक खराब टेलीप्रॉम्प्टर हेच मला संयुक्त राष्ट्रांकडून मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवल्याचा पुनरुच्चार केला. फक्त सात महिन्यांच्या कालावधीत, मी सात युद्धे थांबवली आहेत, असेही ते म्हणाले.
ट्रम्प यांच्या संयुक्त राष्ट्रांच्या भेटीदरम्यान एस्केलेटर आणि टेलिप्रॉम्प्टरमध्ये बिघाड झाल्याची चौकशी अमेरिकेने केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अपमानित करण्यासाठी जाणूनबुजून एस्केलेटर थांबवण्यात आला होता का, याची चौकशी करण्याची मागणी व्हाईट हाऊसने केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी त्यांच्या संयुक्त राष्ट्रांच्या भेटीदरम्यान एक एस्केलेटर आणि टेलिप्रॉम्प्टर दोन्ही बिघाड झाला होता. त्यामुळे अमेरिकेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी आले असताना संयुक्त राष्ट्रातील एखाद्याने जाणूनबुजून एस्केलेटर थांबवला असेल, तर त्यांना काढून टाकले पाहिजे आणि त्यांची त्वरित चौकशी केली पाहिजे, असे प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी एक्सवर म्हटले आहे. व्हाईट हाऊसमधील अनेकांनी ट्रम्प यांच्याविरुद्ध जाणूनबुजून हा प्रकार केल्याची शक्यता वर्तवली आहे.
सुरक्षा यंत्रणेच्या अनवधानाने एस्केलेटरवर राष्ट्रपतींच्या पुढे असलेल्या एखाद्या व्यक्तीने बंद केल्याची शक्यता आहे. एस्केलेटर “रीसेट” करण्यात आला आणि लवकरच पुन्हा कार्यान्वित करण्यात आला, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी एएफपीला सांगितले. टेलीप्रॉम्प्टरबाबत आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, कारण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी टेलीप्रॉम्प्टर व्हाईट हाऊसद्वारे चालवले जाते, असे दुजारिक म्हणाले.