
अल्लाह राखा रहमान, उर्फ एआर रहमान यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने रहमान यांच्याविरुद्ध शिवस्तुतीची धून चोरण्याचा खटला फेटाळला आहे. “पोन्नियिन सेल्वन २” या तमिळ चित्रपटातील “वीरा राजा वीरा” या गाण्याबद्दल दाखल केलेल्या कॉपीराइट उल्लंघनाच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने संगीतकार एआर रहमान यांच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने गाण्याविरुद्ध दाखल केलेला खटला फेटाळून लावला आहे.
गायक फय्याज वसिफुद्दीन डागर यांनी हा दावा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार “वीरा राजा वीरा” हे गाणे त्यांचे वडील नासिर फय्याजुद्दीन डागर आणि काका झहीरुद्दीन डागर यांनी रचलेल्या “शिवा स्तुती” या गाण्यावरून कॉपी केले आहे. त्यांनी सांगितले की, गाण्याचे बोल वेगळे असले तरी लय आणि संगीत रचना “शिवा स्तुती” सारखीच आहे. हे गाणे डागर बंधूंनी जगभरात सादर केले असून, पॅन रेकॉर्ड्सच्या अल्बममध्ये समाविष्ट केले आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले की, त्यांनी कॉपीराइट उल्लंघनाच्या मुद्द्यावर कोणतेही मत दिलेले नाही. परंतु एकल न्यायाधीशाचा आदेश तत्वतः रद्द करण्यात आला आहे.
याआधी एका न्यायाधीशाने असा निर्णय दिला होता की, दोन्ही रचना जवळजवळ सारख्या आहेत. त्यामुळे रहमानला गाण्याची श्रेयनामावली बदलावी लागेल. परंतु न्यायमूर्ती सी. हरिशंकर आणि न्यायमूर्ती ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठाने आता तो आदेश रद्द केला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कलाकाराला केवळ गाण्याचे सादरीकरण करून त्याचे संगीतकार मानले जाऊ शकत नाही. या निर्णयामुळे रहमान आणि चित्रपट निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच गाण्याच्या श्रेयनामावलीमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता राहणार नाही.