लडाखमध्ये ‘Gen-Z’चं रस्त्यावर उतरत उग्र आंदोलन; भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, CRPF च्या गाडीची जाळपोळ

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि अन्य मागण्यांसाठी ‘जेन झी’ रस्त्यावर उतरली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुंक यांच्या समर्थनार्थ उतरलेल्या तरुणांनी उग्र आंदोलन सुरू आहे. बुधवारी सकाळी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि संतप्त जमावाची पोलिसांसोबत झटापट झाली. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर दगफडेक करत कार्यालयाला आगीच्या हवाली केले. एवढेच नाही तर सीआरपीएफच्या गाडीलाही आग लावली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

केंद्र सरकारने 2019 मध्ये जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवले. त्यानंतर जम्मू-कश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश बनवले. याच लडाखमध्ये लेह आणि कारगिलचा समावेश असून येथे पूर्वेकडील राज्याप्रमाणे लडाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करण्यासाठी आणि केंद्रशासित ऐवजी पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलन सुरू झाले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र बुधवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

बुधवारी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक करत जाळपोळ केली. तसेच सुरक्षा जवानांच्या गाडीलाही आग लावून दिली. आंदोलक हिंसक होत असल्याचे पाहताच पोलिसांनी मोर्चा सांभाळत जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून या भागात अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.

काय आहे मागण्या?

  • लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा
  • लडाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करावा
  • लेह आणि कारगिलसाठी वेगवेगळा लोकसभा मतदारसंघ
  • नोकरीत रिझर्व्हेशन आणि स्थानिकांना आदिवासींचा दर्जा