
मोदीजी, मणिपूर हेदेखील ईशान्येकडीलच एक महत्त्वाचे राज्य आहे. तुम्ही वेळीच लक्ष दिले असते तर त्या राज्यातील सामाजिक एकोपा, बंधुभाव खाक झाला नसता. काँग्रेसच्या काळात ईशान्येतील एकही राज्य एवढ्या भयंकर जातीय वणव्यात होरपळले नव्हते. तेव्हा काँग्रेसला जाब विचारण्यापेक्षा मणिपूर तीन वर्षे का जळत होते? अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीन गावे का बसवू शकला? तेथील अनेक गावांची नावे त्या देशाने परस्पर बदलली, तुम्ही गप्प का बसलात? लडाख-गलवानपासून अरुणाचलपर्यंत चीनने तुमच्या नाकाखालून घुसखोरी केली नाही का? त्रिपुरापासून आसामपर्यंत सर्व राज्ये आजही अशांत का आहेत? या प्रश्नांची उत्तरे आधी देशातील जनतेला द्या. काँग्रेसला काय जाब विचारता?
पंतप्रधान मोदी म्हणजे एक अगम्य व्यक्तिमत्त्व आहे. गुंते स्वतःच निर्माण करायचे व त्या गुंत्यातून आपले पाय मोकळे करून काँग्रेसवर खापर फोडायचे हेच उद्योग त्यांनी 11 वर्षांत केले. इतका अपयशी पंतप्रधान जगाच्या पाठीवर दुसरा झाला नसेल, पण लोकांना धर्म-जातीची अफू पाजून धुंद केल्याने छंदी-धुंदी लोक याही स्थितीत पंतप्रधान मोदींचे भजन करतात. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय एकात्मता राखण्यात, किंबहुना आजचा भारत घडविण्यात काँग्रेसचे योगदान आहे. या सगळ्याची भयंकर पोटदुखी असल्याने पंतप्रधान मोदी यांना रोजच काँग्रेस द्वेषाची उबळ येत असते. मोदी पहलगामवर बोलत नाहीत, प्रे. ट्रम्प यांच्या दमबाजीवर गप्प बसतात, ‘ऑपरेशन सिंदूर’ कोणाच्या दबावामुळे मागे घेतले? या प्रश्नाला उत्तर देत नाहीत, पण ‘काँग्रेस एके काँग्रेस’ हे ते बोटे कडाकडा मोडत बोलतात. एकंदरीत काय तर मोदी हे काँग्रेसमय झालेले दिसतात. देशात आतापर्यंत जे जे वाईट घडले ते फक्त आणि फक्त काँग्रेसमुळेच, असा त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू असतो. सोमवारी मोदी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. तेथे म्हणे त्यांनी 5 हजार 125 कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांची भूमिपूजने केली. त्यानंतर इटानगर येथील सभेत बोलताना ते म्हणाले की, ‘‘मोठी विकास कामे करण्याचे धाडस काँग्रेसने कधीच दाखवले नाही. ही त्यांची जुनीच सवय आहे. त्यामुळेच ईशान्य भारताचे नुकसान झाले.’’ एवढ्यावरच ते थांबले नाहीत. भाजप सरकारने हा
दृष्टिकोन बदलल्यानेच
आता तेथे सकारात्मक बदल दिसून येत आहेत, अशी स्वतःची टिमकीही त्यांनी वाजवून घेतली. ईशान्येकडील राज्ये भारताच्या एकता आणि अखंडतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची तसेच संवेदनशील राज्ये आहेत. ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून त्यांना संबोधले जाते. मोदींचे म्हणणे असे की, या राज्यांकडे, तेथील पायाभूत विकासाकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले आणि त्यांच्या सरकारने मात्र लक्ष दिले. मोदी यांनी केलेला हा विनोदच म्हणावा लागेल. मोदी यांचे खरेच या भागाकडे लक्ष असते तर मणिपूरसारखे राज्य दोन-तीन वर्षे सलग वांशिक वणव्यात होरपळले नसते. मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमधील हिंसक संघर्ष हे त्यामागील कारण असले तरी मोदी सरकारने वेळीच लक्ष घातले असते तर हा हिंसेचा वणवा भडकला नसता. बरे, मणिपूरमध्ये बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपचेच राज्य होते. त्यामुळे विरोधी पक्षांचे सरकार आहे म्हणून मोदींनी मणिपूरमधील वांशिक वणव्याकडे दुर्लक्ष केले, असेही म्हणायला जागा नाही. उलट राज्यात स्वपक्षाचे सरकार असूनही मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने दुर्लक्ष केले हे अधिक गंभीर ठरते. मोदी तेथील रक्तरंजित हिंसाचाराकडे फक्त बघत राहिले. हिंसाचार कमी करण्याचा प्रयत्न सोडा, तो कमी व्हावा अशी मोदी सरकारची मानसिकताही गेल्या तीन वर्षांत जाणवली नाही. रोम जळत असताना निरो बासरी वाजवत बसला होता, तसे मोदी मणिपूर तीन वर्षे जातीय वणव्यात जळत असताना
दिल्लीत शांतपणे
आपल्या दाढीवरून हात फिरवत बसले होते. मणिपूर येथे जा, तेथील हिंसाग्रस्त लोकांची भेट घ्या, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना दिलासा द्या, अशी विनंती विरोधी पक्षांपासून मणिपूरमधील ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंपर्यंत सगळ्यांनी मोदी यांना केली. मात्र मोदींनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मणिपूरला प्रत्यक्ष भेट सोडा, संसदेतही ते त्यावर फक्त दोन मिनिटे बोलले. याला संपूर्ण दुर्लक्ष नाही तर काय म्हणायचे? मोदीजी, मणिपूर हेदेखील ईशान्येकडीलच एक महत्त्वाचे राज्य आहे. तुम्ही वेळीच लक्ष दिले असते तर तेथील मैतेई आणि कुकी समाज परस्परांपासून पूर्ण तुटले नसते. त्या राज्यातील सामाजिक एकोपा, बंधुभाव खाक झाला नसता. तीन वर्षे पाठ फिरवल्यानंतर तुम्ही 13 सप्टेंबर रोजी एक दिवसाची भेट मणिपूरला दिली आणि तुमच्या दुर्लक्षाचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमची पाठ फिरताच तेथे पुन्हा हिंसेचा उद्रेक झाला. काँग्रेसच्या काळात ईशान्येतील एकही राज्य एवढ्या भयंकर जातीय वणव्यात होरपळले नव्हते. तेव्हा काँग्रेसला जाब विचारण्यापेक्षा मणिपूर तीन वर्षे का जळत होते? अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीन गावे का बसवू शकला? तेथील अनेक गावांची नावे त्या देशाने परस्पर बदलली, तुम्ही गप्प का बसलात? लडाख-गलवानपासून अरुणाचलपर्यंत चीनने तुमच्या नाकाखालून घुसखोरी केली नाही का? त्रिपुरापासून आसामपर्यंत सर्व राज्ये आजही अशांत का आहेत? या प्रश्नांची उत्तरे आधी देशातील जनतेला द्या. काँग्रेसला काय जाब विचारता?