Latur News – ‘किल्लारी’सारख्या घटनेची भीती! निलंगा तालुक्यातील कासार सिरसी परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के

निलंगा तालुक्यातील कासार सिरसी परिसरातील मौजे हासोरी बुद्रुक, हसोरी खुर्द परिसरात बुधवारी रात्री 9.25 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. अचानक जमिनीतून गूढ आवाज येऊ लागले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून 1993 च्या किल्लारी भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

कासार सिरसी परिसरातील मौजे हासोरी बु., हासोरी खु., हरीजवळगा, उस्तुरी व बडूरसह परिसरात बुधवारी रात्री जमिनीतून गूढ आवाज होऊन भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. यामुळे गावातील सर्व नागरिक भयभीत होऊन घरातून बाहेर पडले. यापूर्वीही या परिसराला अनेकदा असे धक्के बसले असून 1993च्या किल्लारी भूकंपाची पुनरावृत्ती होईल की काय? अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र नवी दिल्ली येथे सदरील माहिती देऊन चौकशी केली असता भूकंपाची नोंद झाली नसल्याचे त्यांच्याकडून कळविण्यात आले आहे. सिस्मोलॉजिकल डेटा तपासण्यात आला असल्याचे त्यांनी कळवले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.