
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला साडीतील फोटो काँग्रेसचे डोंबिवलीतील ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे उर्फ मामा यांनी फेसबुकवर फॉरवर्ड केला. त्याची शिक्षा म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मामा पगारे यांना साडी नेसवून शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर त्यांचा हात पकडून धक्काबुक्की करत जातिवाचक शिवीगाळदेखील केली. भाजपच्या या गुंडागर्दीने मामा पगारे यांना जबर धक्का बसला असून त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मामा पगारे यांचे वय ७२ असून ते काँग्रेसचे कट्टर पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी फॉरवर्ड केलेल्या पोस्टमुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष संतप्त झाले आणि नंदू परब, संदीप माळी, दत्ता माळेकर हे संतप्त झाले आणि पगारे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्कीदेखील केली. या प्रकारानंतर पगारे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीची तक्रारदेखील दाखल केली. मात्र या प्रकारामुळे त्यांचा रक्तदाब वाढला असून बेशुद्ध झाले.
काँग्रेससाठी अखेरपर्यंत लढणार
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या शिष्टमंडळाने रात्री उशिरा कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचीदेखील मागणी केली. पगारे हे मागासवर्गीय समाजाचे असल्याने त्यांना त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोटे यांनी केली आहे. मला साडी नेसवा नाहीतर कोणतीही शिक्षा करा मी काँग्रेससाठी अखेरपर्यंत लढत राहणारच, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला.