
दोन महिन्यांपासून डहाणू तालुक्यातील सूर्यनगर येथे असलेल्या एमएमआरडीएच्या प्लाण्टमधील कामगारांना हक्काचा पगार मिळालेला नाही. ऐन सणासुदीच्या काळात त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून प्रशासनाच्या बेफिकीरपणाविरोधात आज कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. लवकरात लवकर पगार द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एमएमआरडीएच्या प्लाण्टमधील ३० हून अधिक कामगारांनी एकत्र येत आंदोलनाचे हत्यार उपसले. या कामगारांना जीआय ग्रुप नेटवर्क अॅण्ड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या लेबर कॉण्ट्रॅ क्ट कंपनीकडून वेतन दिले जाते. पण ऑगस्ट महिन्यापासून पगाराचा एक रुपयाही मिळालेला नाही. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून दसरा, दिवाळी हे सण तोंडावर आले आहेत. पगारच मिळाला नाही तर सण साजरे कसे करणार, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबाला पडला आहे.
वेतनाची तारीख निश्चित करा
एमएमआरडीएमधील कामगार रोज आठ तास काम करतात. त्यांना १३ हजार ७०० रुपये एवढा पगार असून तो वेळेवर न मिळाल्याने घर खर्च भागवताना त्यांची दमछाक होत आहे. या कामगारांनी पूर्वी रोज बारा तास काम केले आहे. त्याची थकबाकीदेखील अद्यापि मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाला लेखी निवेदन दिले असून पगाराची तारीख निश्चित करणे, वेतनवाढ अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.