बुटाला चिखलही लागू नये म्हणून महामार्गा जवळ असलेल्या शेतीच्या पाहणीची नौटंकी! मिंधे गटाच्या मंत्र्याला संतप्त शेतकऱ्यांचा घेराव

नांदेड जिल्ह्यात मिंधे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला. शासनाने दिलेली मदत तोकडी आहे, असे म्हणत संजय राठोड यांना घेराव घातला. हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकर्‍यांची क्रूरचेष्टा आता तरी थांबवा, असा संतापही शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केला.

पीएम केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, उद्धव ठाकरे यांची मागणी

मिंधे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी आज हदगाव, अर्धापूर, नांदेड आणि लोहा तालुक्याचा धावता दौरा केला. यावेळी अर्धापूर तालुक्यात त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताची पाहणी केली. साहेबांच्या बुटाला चिखल लागू नये म्हणून महामार्गाच्या बाजूला असलेल्या शेतीची मंत्री संजय राठोड यांनी पाहणी केली. तेव्हा शेतात आणि वावरात येवून बघा, काय परिस्थिती आहे ते, असा संताप शेतकर्‍यांनी केला.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पंचांग पाहणार आहात का? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल, सातबारा कोरा करण्याची मागणी

शेतकर्‍याच्या एक एकर शेतासाठी तीन हजार रुपये सोयाबीनची बॅग, दोन हजार खताची बॅग, अन्य खर्च वेगळा, असे असताना हेक्टरी जाहीर केलेली मदत म्हणजे आमच्या तोंडाला पानेच पुसली, असे म्हणत शेतकर्‍यांनी राठोड यांना घेरले. आम्ही आर्थिक संकटात आहोत, पिके पूर्ण पाण्याखाली गेली, खरिपाचा हंगाम वाया गेला, अतिवृष्टीत शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे, झालेला खर्च आणि जाहीर केलेली मदत ही शेतकर्‍यांची क्रूरथट्टा करणारी आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आणि त्यांना घेराव घातला.

महामार्गाच्याजवळ असलेल्या शेतीची पाहणी मंत्र्यांनी केली. साहेबांच्या बुटाला चिखलही लागू नये म्हणून महामार्गाच्या जवळ असलेल्या शेतीची पाहणी करून नौटंकी केली. नदीकाठावरच्या शेतकर्‍याचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे खर्‍या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला हवी होती, आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावी, अन्यथा अराजकता माजेल, अशा संतप्त भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. यामुळे अर्धापूर तालुक्यातील दौरा आटोपता घेवून मंत्री दुसर्‍या गावाकडे रवाना झाले.