महायुती सरकारकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक, यापूर्वीच्या मदतीतले 30 टक्केही पोहोचले नाहीत

राज्यात यंदा जून ते सप्टेंबर कालावधीतील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरकारने 2236 कोटी रुपये नुकतेच जाहीर केले, पण त्यापूर्वीच्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी 13 हजार 819 कोटी रुपयांची मदत सरकारने घोषित केली होती. परंतु त्यातील 30 टक्केही रक्कम शेतकऱयांच्या खात्यात जमा झाली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून पाहणी केली. त्यावेळी एका शेतकऱयाने त्यांना यापूर्वीची मदत अद्याप जमा झाली नसल्याचे सांगितले. त्या शेतकऱ्याला अजित पवार यांनी दमदाटी केली होती. त्यावरून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

दानवे यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट करून यापूर्वी सरकारने जाहीर केलेल्या मदतीचे आकडेच दिले आहेत. मार्च 2023 ते ऑगस्ट 2024 दरम्यानचे ते आकडे आहेत. अवकाळी, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, वादळी वारा व गारपीठ, सततचा पाऊस आदी नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱयांसाठी मदत देण्यास त्या निधीची तरतूद करण्यात आली होती, परंतु त्यातील 30 टक्के रक्कमही शेतकऱयांपर्यंत पोहोचलेली नाही असा आरोप दानवे यांनी केला आहे. यातील किती रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात गेली हे सरकारने पत्रकार परिषद घेऊन सांगावे असे आव्हानही त्यांनी दिले.

घोषणासम्राट शिंदेंनी माहिती द्यावी – दानवे

अंबादास दानवे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. घोषणासम्राट आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळातील या घोषणांवर प्राधान्याने बोलायला हवे, नुसतं जाकीट घालून बोटतून हिंडून होत नसतं, असा खोचक टोला दानवे यांनी लगावला आहे.