
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांत सराईत गुन्हेगारांच्या सहा टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी दिली. या टोळ्यांमधील एकूण 68 गुन्हेगारांवर कारवाई झाली असून, आणखीही काही टोळ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला.
विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी जिह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पश्चिम महाराष्ट्रातील गणेशोत्सव आणि इतर सण शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस यंत्रणेचे कौतुक केले असल्याचे सांगितले. सर्वसामान्य जनतेशी सुसंवाद ठेवण्याबरोबरच गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहील, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा पोलीस दलाचा प्रयत्न आहे. जनतेने तात्काळ न्यायाची अपेक्षा ठेवून केलेले अर्ज आणि वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झालेल्या अर्जांचा योग्य पद्धतीने निपटारा करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी अर्ज अदालतसारखे उपक्रम राबविले जात आहेत. यावेळी विविध गुह्यांची उकल होण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान, मिरजेतील श्री गांधी चौक गणेशोत्सव मंडळातर्फे कोल्हापूर पोलीस परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना सांगलीतील पोलीस अधीक्षक कार्यालतातील कार्यक्रमात सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य जहीर अहमद मुजावर मंडळाचे अध्यक्ष प्रभात हेटकाळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. यावेळी मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिलडा, तासगावचे उपाधीक्षक अशोक भवड, जतचे उपाधीक्षक सचिन थोरबोले, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, सांगली शहरचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव, ईश्वरपूरचे निरीक्षक संजय हारूगडे, महात्मा गांधी चौकचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, कुपवाडचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यासह जिह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.