
डहाणूच्या सूर्यनगर येथील एमएमआरडीए प्लॅण्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांना अखेर दोन महिन्यांचा थकीत पगार मिळाला आहे. प्रशासनाच्या बेफिकिरीविरोधात आंदोलनाचा बडगा उगारताच व्यवस्थापन ताळ्यावर आले असून पुढील महिन्यापासून दर महिन्याला नियमितपणे वेतन दिले जाईल, असे लेखी आश्वासन कंपनीने दिले आहे.
एमएमआरडीएच्या प्लॅण्टमधील लेबर कॉण्ट्रॅक्ट जीआय ग्रुप नेटवर्क अॅण्ड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. प्लॅण्टमध्ये ३० हून अधिक कामगार काम करीत असून दोन महिने वेतन न मिळाल्याने ऐन नवरात्रोत्सवात संकट ओढावले. या कामगारांनी एमएमआरडीएच्या गेटवरच उग्र आंदोलन बुधवारी छेडले होते. याबाबतचे वृत्त आज दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच व्यवस्थापनाची तंतरली आणि २४ तासाच्या आतच कामगारांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्यांचा पगार जमा झाला आहे. त्यामुळे सर्व कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.
…आणि कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला
एमएमआरडीए प्लॅण्टमधील कामगारांना वेतन न मिळाल्याने घरखर्च भागवायचा कसा, असा प्रश्न ऐन सणासुदीच्या काळात त्यांच्या कुटुंबाला पडला होता. आंदोलनाच्या दणक्याचे वृत्त आज दैनिक ‘सामना’ मध्ये प्रसिद्ध होताच पगार मिळाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.