
वरच्या धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या विसर्गात कपात करण्यास सुरुवात झाल्याने सीना व भोगावती नद्यांना आलेला महापूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तात्पुरत्या निवारा कक्षातील शेतकरी आणि ग्रामस्थांना आता आपल्या घराकडे जाण्याचे वेध लागले आहेत. मात्र, सर्वत्र चिखलमय परिस्थिती असल्याने घरी जाऊन करायचे काय? खायचे काय? यांसह विविध प्रश्नांनी पूरग्रस्तांना ग्रासले आहे.
पुराच्या पाण्याचा मोहोळमधील तब्बल 22 गावांना फटका बसला आहे. यातील घाटणे आणि नांदगाव या दोन गावांना पुराच्या पाण्याने पूर्ण वेढा टाकला होता. तो आता हळूहळू सैल होऊ लागला आहे. मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठच्या मुंडेवाडी, अष्टे, अर्जुनसोंड, लांबोटी, पोफळी, विरवडे खुर्द, शिरापूर (सो), बोपले, एकुरके, पासलेवाडी, शिंगोली, पीर टाकळी, रामहिंगणी, नांदगाव, विरवडे बुद्रुक, शिरापूर (मो), तरटगाव, नरखेड, भोयरे, मलिकपेठ, घाटणे आणि मोहोळ या गावांना पुराचा फटका बसला आहे. या गावातील 2300 लोकांची जिल्हा परिषद शाळा आणि समाजमंदिरात तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. आता पाणी ओसरू लागल्याने पूरग्रस्तांना परतीचे वेध लागले आहेत.
पूरग्रस्तांची विविध सामाजिक आणि राजकीय नेतेमंडळींनी भोजनाची व्यवस्था केली आहे. मात्र, या पूरग्रस्तांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती. याची दखल घेऊन तहसीलदार सचिन मुळीक यांनी तातडीने 15 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रत्यक्षात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 144 पूरबाधितांना ‘आपदा मित्रां’च्या माध्यमातून वाचविण्यात आल्याचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी सांगितले.
पूरबाधितांचे सरकारी मदतीकडे लक्ष
पुराचा वेढा सैल होत असताना आता पूरबाधितांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत. या पुराच्या पाण्याने ज्यांची घरे वाहून गेली आहेत किंवा मोठे नुकसान झाले आहे, अशा पूरबाधितांना तातडीने मदत देण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.
पूरग्रस्तांना मदतीचा ओघ
वरच्या धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या विसर्गात कपात करण्यास सुरुवात झाल्याने सीना भोगावती नदीला आलेला महापूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय नेतेमंडळींकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
‘श्रीकृष्ण गुरुकुल’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रमोद आवताडे यांनी पूरबाधित विरवडे बुद्रूक येथील ग्रामस्थांसाठी भोजन आणि पाण्याची व्यवस्था केली. राष्ट्रवादीचे अण्णासाहेब पाटील यांनी नांदगाव पोफळी भागातील पूरग्रस्तांसाठी नाष्टय़ाची, संजय क्षीरसागर यांनी जेवणाची व्यवस्था केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, महेश देशमुख, तालुकाप्रमुख अशोक भोसले यांनी शिंगोली भागातील ग्रामस्थांना नाश्त्याची सोय केली आहे. मोहोळ ऋणानुबंध सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जेवण, पाणी, उपवासाचे साहित्य, पाणी बॉटल, किराणा सामान अशी मदत केली आहे.
पाच ट्रक जीवनावश्यक वस्तू
महापुराचा तडाखा बसलेल्या सोलापूर जिह्यासह मराठवाडय़ातील पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू पाटील समूहातील संस्थांनी पाच ट्रक जीवनावश्यक वस्तू व जनावरांना पशुखाद्य पाठवून मदतीचा हात दिला आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, राजारामबापू पाटील सहकारी दूध संघ व राजारामबापू सहकारी बँक आदी संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.