
कल्याण डोंबिवली महापालिकेने कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. २०२५-२०२६ या आर्थिक वर्षातील कर वसुलीचे उद्धिष्ट गाठण्यासाठी प्रशासन इन अॅक्शन झाले. कर चुकवल्यास पाणी तोडण्याबरोबरच मालमत्ता जप्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे थकीत माल मत्ताधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कर विभागाने मालमत्ता कराची देयके मालमत्ताधारकांना वितरित केली आहेत. मात्र अद्यापही मोठ्या संख्येने करदात्यांकडून कर भरणा झालेला नाही. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांना जप्ती वॉरंट बजावण्यात येत आहेत. मुदतीत कर न भरल्यास संबंधित मालमत्तांवर जप्ती व अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. एवढ्यावरच न थांबता अशा मालमत्तांची नळ जोडणी खंडित करण्याचाही निर्णय महापालिकेने घेतला आहे.
थकीत रकमेवर दंड व्याज
महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दिलेल्या माहितीनुसार थकीत रकमेवर दर महिन्याला २ टक्के दंडात्मक व्याज आकारले जाणार आहे. त्यामुळे करदात्यांनी विलंब न करता तातडीने मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.