
मराठवाड्यावर आभाळ कोसळले असून बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. धाराशीवमधील अनेक तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असून शेतकरी अडचणीत आलेला आहे. एकीकडे जिल्ह्यात अस्मानी संकट असताना दुसरीकडे जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात मग्न असल्याचे समोर आले आहे.
धाराशीवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा नाचगाण्यात मग्न असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिल्ह्यातील नागरिक अतिवृष्टी आणि पूर अशा संकटात असताना जिल्हाधिकारी तुळजापूरमध्ये एका कार्यक्रमात नाचत होते. 24 सप्टेंबर रोजीचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी जिल्हाधिकारी पुजार यांच्यावर सडकून टीका केली आहे. जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झालेली असताना आणि शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांना असे बेजबाबदार वर्तन शोभत नाही, अशी खरडपट्टी नेटकऱ्यांनी काढली.
कीर्ती किरण पुजार हे तुळजापूर येथे आयोजित नवरात्रोत्सव कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पत्नीसह आणि धाराशीवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह मंचावर डान्स केला. याचा व्हिडीओ आता समोर आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वर्तन बेजबाबदारपणाचे असल्याची टीका केली.
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे धाराशीव जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झालेला असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाचगाण्यात दंग असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. pic.twitter.com/319ueUBGY6
— Saamana Online (@SaamanaOnline) September 26, 2025
कैलास पाटील यांनी घेतला समाचार
अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामे करायचे बाकी असतानाच जिल्हाच्या प्रमुखांनी असे बेजजबाबदार वागणे चुकीचे आहे. पंचनामा झाला आहे का हे बघणे, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत पोहोचवणे आणि त्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे हे यांचे काम आहे. शेतकऱ्यांना पंचनाम्याची तक्रार करायची असेल तर त्यांच्याकडे दोनच पर्याय असतात, एक जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी. तीच लोक जर असे वर्तन करत असतील तर शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडे? असा सवाल करत यातून शासन किती असंवेदनशील आहे हे दिसून येत असल्याची टीका आमदार कैलास पाटील यांनी केली.
शेतकरी एकीकडे आत्महत्या करत असताना दुसरीकडे असं वर्तन होत असेल तर जिल्हाधिकार्यांवर आणि उपनिवासी जिल्हाधिकार्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर शेतकरी हे शासनाचेच वर्तन आहे असं समजतील, असेही कैलास पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा सर्वात जास्त फटका धाराशिव जिल्ह्याला बसला आहे. सरकारच्या वतीने सांगितलं जातंय की महाराष्ट्रासाठी 2200 कोटी दिले. धाराशीव जिल्ह्यासाठी 189 कोटी दिले. परंतु ही ऑगस्ट महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीची मदत आहे. सध्या सप्टेंबर महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्याचा एक रुपया सरकारने दिला नाही. जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले नाहीत, म्हणून मदतीला उशीर झाल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला.