
कर्जमाफीबाबत शेतकऱ्याने प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले होते. आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलो का, असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्याला झापले. धाराशीव जिल्ह्यात हा प्रकार घडला होता. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मदतीबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला राजकारण करू नका, असे सुनावले होते. याचाही संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.
माध्यमांनी याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ही मग्रुरी आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना मराठवाड्याचे दु:ख कळलेले नाही. आता किती मदत कळणार? विचारले तेव्हा फडणवीस म्हणाले की, राजकारण करू नको. यात कसे राजकारण आहे? एका शेतकऱ्याचे आयुष्य वाहून गेले, तो उपाशी आहे आणि तुम्ही त्याला म्हणता राजकारण करू नका. तुमच्या डोक्यात सडके राजकारण आहे, म्हणून तुम्हाला हे सुचते मिस्टर फडणवीस.
कुणी म्हणते पैशाचे सोंग आणता येणार नाही, कुणी म्हणते आम्ही 6 वाजता गोट्या खेळायला आलोय का? तुम्ही सगळे गोट्या खेळण्याच्याच लायकीचे आहेत. लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. तुम्ही भ्रष्ट शासनकर्ते आहात. शेतकऱ्याला वाचवायला नाही तर तुम्ही तुमचे कातडे वाचवायला गेलेला आहात. दुसरीकडे ठाण्याचे उपमुख्यमंत्री फोटो छापून मदत करत सुटले आहेत. त्यांनी पंजाबचा धडा घ्यावा. भगवंत मान यांची प्रकृती बरी नसताना आणि केंद्र सरकार मदत द्यायला तयार नसतानाही पंजाब सरकारने शेतकऱ्यांची मजबुतीने मदत केली. तुम्ही आतापर्यंत काय केले? पंचनामे सुरू झालेले नाहीत. प्राथमिक मदतही पोहोचलेली नाही, असा घणाघात राऊत यांनी केला.
काल उद्धव ठाकरे कळंबमध्ये गेले तेव्हा गाडीच्या खिडकीवर एक वृद्ध महिला धावत आली आणि म्हणाली, साहेब गरिबांच्या घरात कुणी येत नाही. मी मांगाची बाई आहे. आमच्या वस्तीत कुणीच आले नाही. उद्धव साहेबांनी तिचा पत्ता विचारला. येरमवाडी गावात जाऊन पुरात वाहून गेलेल्या घरात जाऊन उद्धव ठाकरे बसले. त्यांचे दु:ख समजून घेतले. देवेंद्रजींनी, मिंध्यांनी, अजित पवारांनी काय केले?
मुख्यमंत्र्यांनी काल अमित शहांना निवेदन दिले. आम्हाला शेतकरी निवेदन देतात इथपर्यंत माहिती आहे. पण देशाच्या गृहमंत्र्याला, सहकारमंत्र्याला, क्रिकेटच्या बादशहाला निवेदन द्यावे लागतेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे. हे राज्यकर्ते आहेत का? मराठवाड्यात काय चालले आहे, तुम्ही मुंबई कसले कार्यक्रम करता? अमित शहांकडे सहकार खाते आहे. त्या सहकार खात्याच्या माध्यमातून ते पाच-दहा हजार कोटी महाराष्ट्राला देऊ शकतात. अमित शहा हे देशाच्या क्रिकेटचे आजचे सुत्रधार आहे. सगळ्यात जास्त पैसा या धंद्यात आहे. पाकिस्तान बरोबर सव्वा दोन लाख कोटींचा सट्टा खेळला गेला. हे अमित शहांना माहिती नाही. त्यांनी आपल्या चिरंजीवाला सांगावे की, बीसीसीआयकडून दोन-पाच हजार कोटी द्या.
आम्ही गोट्या खेळायला आलो का! कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यावर अजित पवार चिडले