लातूर तालुक्यात पुन्हा भूकंपाचा धक्का; बोरवटीजवळ केंद्र बिंदू

एकीकडे सतत झोडपणारा पाऊस, नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेली पुरस्थिती यामुळे लातूर संकटात सापडले आहे. त्यातच आता जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे लातूरमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे ३० सप्टेंबर १९९३ च्या भुकंपाच्या आठवणी आता पुन्हा जाग्या होत आहेत.

या वर्षी लातूरकर नैसर्गिक आपत्तीस तोंड देत आहेत. पावसाळ्यापूर्वी अवकाळीने थैमान घातले होते. पावसाळ्यात आजपर्यंत कधी बघितली नाही अशी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता भुकंपाची मालिकाच सुरू झाली आहे. अगोदर लातूर तालुक्यातील मौजे मुरुड अकोला हे भूकंपाचे केंद्र होते. नंतर कासारशिरसी परिसरात भूकंपाचा धक्का बसला. तर शुक्रवारी पुन्हा लातूर तालुक्यातील मौजे बोरवटीजवळ हा भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.

लातूर तालुक्यात शुक्रवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मौजे बोरवटी या गावात भूकंपाचे धक्के जाणवले . यासंदर्भात राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र नवी दिल्ली येथे सदरील माहिती देऊन चौकशी करण्यात आली असता 2.2 रिश्टर स्केल इतक्या सौम्य भूकंपाची नोंद झाली असल्याचे सांगण्यात आले. हा भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.