मराठवाड्याचे पार वाटोळे झाले! खायला अन्न नाही, हाताला काम नाही, पोट कसे भरायचे शेतकऱयांच्या डोळय़ात अश्रू

>> महेश कुलकर्णी

रानोमाळ येणारा पिकांचा सडका, कुबट वास, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली दलदल, खरडून गेलेल्या जमिनी, त्यावर पडलेली विवरे, शिवारात बेवारस पडलेल्या मृत पशुधनाचे लचके तोडण्यासाठी घिरटय़ा घालणारे पक्ष्यांचे थवे… हे आहे मराठवाडय़ाचे विदारक चित्र! निसर्गाने मराठवाडय़ाचे पार वाटोळे केले. खायला अन्न नाही आणि हाताला काम नाही… कर्ज फेडायचे कसे आणि पोट भरायचे कसे या प्रश्नांनी जर्जर झालेल्या शेतकऱयाच्या डोळय़ातून येणारा महापूर पाहण्यासाठी सुरू झालेले पूरपर्यटन मात्र सध्या जोरात सुरू आहे!

छत्रपती संभाजीनगरपासून ते नांदेडपर्यंत आणि बीडपासून लातूरपर्यंत सगळा मराठवाडा महापुराच्या तडाख्यात सापडला. जायकवाडी, मांजरा, तेरणा, विष्णुपुरी, येलदरी, सिद्धेश्वर, शिवना, निम्न दुधना झाडून साऱया धरणांचे दरवाजे सताड उघडे ठेवण्याची वेळ अजस्त्र्ा पावसाने आणली. मांजरा, तेरणा, सिना कोळेगाव ही धरणे मुळातच दुष्काळी भागात उगम पावणाऱया नद्यांवर बांधलेली. ही धरणे निम्मी भरली तरी शेतकरी खुश. यंदाच्या पावसाळय़ात ही धरणे मे महिन्यापासून तुडुंब भरलेली. त्यामुळे सतत पडणाऱया पावसाचे पाणी वाहून नेण्याशिवाय नद्यांना पर्यायच उरला नाही.

हवामान बदलाचा अभ्यास करणार कधी?
मराठवाडय़ाचा भूगर्भ खडकाळ आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी आहे. मे, जून आणि जुलैमध्ये झालेल्या पावसाने भूजल पातळी वाढली. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस जमिनीत न मुरता भूपृष्ठावरच राहिला. त्यामुळे शेतशिवारामध्ये चार चार फूट पाणी साचले. मराठवाडय़ाच्या हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे काहीही झाले नाही.

नद्यांचे नाले कुणी केले?

मराठवाडय़ातून वाहणाऱया गोदावरी, मांजरा, तेरणा, सिंदफणा, पूर्णा, दुधना आदी मोठय़ा नद्या, त्यासोबतच या नद्यांच्या उपनद्यांची नैसर्गिक पात्र रचनाच बदलून गेली आहे. नदीकाठ कोरून आत घुसलेली शेते, वाळूचा उपसा करण्यासाठी नद्यांची झालेली उरफोडी आणि पात्रांमध्ये होत असलेली अतिक्रमणे याचा कधीही विचार झाला नाही. त्यामुळे अतिवृष्टीचा ताण सहन करण्याची क्षमताच या नद्यांमध्ये उरली नाही. परिणामी पात्र फुगत गेले आणि तटलेल्या पाण्याने वाट फुटेल तिकडे धाव घेतली. बीड, धाराशिव, नांदेड जिल्हय़ांमधील पुराची ही कथा. नद्या वाळूची निर्मिती स्वतःसाठी करतात. पाण्याबरोबर नदी वाळू काठावर टाकून पुढे प्रवाहित होते. मराठवाडय़ातील एकही नदी अशी नाही की वाळूसाठी जिच्या नरडीला जेसीबी लागलेला नाही. मराठवाडय़ातील नद्यांनी आता वाळूची निर्मितीच करणे बंद केले आहे. पुराची तीक्रता वाढण्याचे हे महत्त्वाचे कारण. परंतु त्याकडे कुणाचेच लक्ष नाही.

 केवळ सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाडय़ातील जवळपास सगळेच रस्ते खराब झाले आहेत. अनेक पूल, बंधारे, पाझर तलाव फुटले. शिवारात वस्ती करून राहणारे संसार उघडय़ावर आले. घरांची पडझड अपरिमित आहे. पशुधन वाहून गेले. जमिनी खरवडल्या. शेतांचे जलाशय झाल्याने जमिनी चिभडल्या. फळबागा वाहून गेल्या. खरिपाचा एक दाणाही शिवारात शिल्लक राहिला नाही.

 मराठवाडा हा पर्जन्यछायेतला प्रदेश. कधी बेसुमार पाऊस तर दोन दोन वर्षे आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ. पण या दशकात मराठवाडय़ातील पर्जन्यमानात प्रचंड बदल झाला आहे. यंदा तर मे महिन्यात अतिवृष्टी झाली. नंतर जेव्हा जेव्हा पाऊस झाला तेव्हा अतिवृष्टीचीच नोंद झाली.