इस्रायलने जगाला चक्रावून सोडले; मोबाईल हॅक, गाझात नेतन्याहू यांचे भाषण लाईव्ह!

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या व्यासपीठावरून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला धमकी देत निर्वाणीचा इशारा दिला. मुख्य म्हणजे तंत्रज्ञानात जगाच्या पुढे असलेल्या इस्रायलने नेतन्याहू यांचे हे भाषण गाझापट्टीत सर्वांच्या मोबाईलवर सक्तीने प्रक्षेपित केले. इस्रायलच्या लष्कराने नेतन्याहू यांच्या भाषणावेळी गाझावासीयांचे मोबाईल हॅक केले आणि त्यावर कंट्रोल मिळवला, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.

मी पंतप्रधान नेतन्याहू बोलतोय… हा व्हिडिओ गाझापट्टीतील मोबाईलमध्ये प्ले झाला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. विशेष म्हणजे मोबाईलसोबतच लाऊडस्पीकर्सवरही नेतन्याहू यांचे भाषण लागले होते. हे लाऊडस्पीकर्सही जागोजागी प्लांट करण्यात आले होते. त्याचा उल्लेख नेतन्याहू यांनी केला. प्रथम हिब्रू आणि नंतर इंग्रजीतून त्यांनी संबोधित केले.

अनेक देशांचा भाषणावर बहिष्कार

माणुसकीच्या नात्याने इस्रायलने युद्ध थांबवावे असे विविध देशांकडून सांगण्यात आले आहे. पण इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमासवर हल्ले थांबणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील इस्रायल सरकारवर जगातील अनेक देश नाराज आहेत. या नाराजीचे पडसाद आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दिसले. नेतन्याहू व्यासपीठावर भाषणासाठी येताच मोठा ड्रामा घडला. अनेक देशांच्या प्रतिनिधींनी सभात्याग केला.

खतम करू, हमासला धमकी

संयुक्त राष्ट्रांतून मी थेट तुमच्याशी बोलत आहे, असे ते हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली नागरिकांना उद्देशून नेतन्याहू म्हणाले. तुम्ही जोपर्यंत सुखरूप घरी परतत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी हमासच्या पैदेत असलेल्या इस्रायली नागरिकांची नावेच त्यांनी वाचून दाखविली. 48 इस्रायली नागरिकांना तुम्ही पैदेत ठेवलंय. त्यांची तत्काळ सुटका करा अन्यथा तुमचा विनाश अटळ आहे. जिथे असाल तिथून हुडकून काढून तुमचा खात्मा करणार, असा इशाराच त्यांनी दिला.