
साक्षात भगवान शंकरांनी चंद्राला अगदी हळुवारपणे आपल्या मस्तकावर धारण केले आहे तरीही दिवसेंदिवस तो कृश होतो आहे. खरेच आहे की, परक्याच्या आश्रयाने राहणे अतिशय कष्टप्रद असते. अगदी कमी शब्दांत वास्तव मांडणे हे अन्योक्ती या प्रकाराचे खास वैशिष्टय़ आहे. लाचारीसारखे दुसरे दुःख नाही. वरकरणी पाहता तुम्ही सुखात आहात असे वाटू शकते. इथे भगवान शंकरांनी अतिशय आदराने चंद्राला मस्तकावर स्थान दिले आहे. म्हणजे किती सुख असे वाटू शकते, पण खरे सुख ‘स्वाधीन’तेत किंवा स्वतंत्र असण्यात आहे. सोन्याच्या पिंजऱयात मोत्याचे दाणे मिळाले तरी ते नकोसे होतात हेच खरे. पौर्णिमेच्या चंद्राचे हळूहळू कृश होत जाणे हे इथे मानी माणसाच्या स्वभावाशी जोडले आहे. तो फार काळ परावलंबी होऊन जगू शकत नाही. त्यात त्याला सुख लाभणे शक्यच नाही. अशी कितीतरी उदाहरणे इतिहासातही दाखवता येतील, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सहज उपलब्ध असलेल्या मान-सन्मानांचा त्याग केला. त्यानिमित्ताने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गाऊन अजरामर केलेल्या एका नाटय़पदाची आठवण होते – ‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला, सजीवपणे घडती सारे मरणभोग त्याला.’ त्यातील आशयही हाच आहे.
डॉ. समिरा गुजर-जोशी


























































