जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा – शैलेश कुमारला सुवर्ण; वरुण भाटीला कांस्य

हिंदुस्थानने जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत शनिवारी पदकतालिकेत खाते उघडले. पुरुषांच्या उंच उडीत टी-६३ प्रकारात शैलेश कुमारने सुवर्णपदक पटकावत विक्रमी झेप घेतली, तर वरुण भाटीने कांस्यपदक जिंकले.

शैलेशने टी-४२ प्रकारात १.९१ मीटर उंची पार करून नवीन स्पर्धा विक्रम नोंदवला. अमेरिकेचा ऑलिम्पिक विजेता एझा फ्रेक याने रौप्यपदक मिळवले. फ्रेक आणि वरुण भाटी या दोघांनी १.८५ मीटरची उंची पार केली होती; मात्र काउंटबॅकमुळे फ्रेकने रूपेरी यश संपादन केले, तर भाटीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. हिंदुस्थानचा राहुल हा आणखी एक खेळाडू स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या पाचपैकी तिसरा खेळाडू ठरला होता. मात्र, तो १.७८ मीटरपेक्षा जास्त उंची पार करू शकला नाही आणि त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.