
भाईंदरमधील सहा गावांच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार करण्यात आली आहे. महापालिकेने आपल्या हद्दीतील उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगरी तसेच मोरबा गावांचा समावेश असलेला प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. यामध्ये अरुंद रस्ते रुंद करतानाच खेळासाठी मैदाने, फिल्म स्टुडिओ, चौपाटी, औद्योगिक क्षेत्र तसेच पर्यटन केंद्रासाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे खाडीकिनाऱ्यावरील या गावांमध्ये विकासाची गंगा वाहणार आहे.
एमएमआरडीएने मुंबई महापालिका हद्दीतील गोराई व मनोरी आणि भाईंदर महापालिका हद्दीतील सहा गावांचा स्वतंत्र विकास आराखडा तयार केला होता. मात्र त्यानंतरही या परिसराचा फारसा विकास झाला नाही. उलट अतिक्रमणच वाढल्याने या खाडीकिनाऱ्यावरील आठ गावांना बकाल स्वरूप प्राप्त झाले. दरम्यान एमएमआरडीएने तयार केलेल्या विकास आराखड्याची मुदत संपताच भाईंदर महापालिकेने आपल्या हद्दीतील उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगरी, मोरबा या सहा गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे.
उत्तन नवे प्रवेशद्वार
बहुतांश आरक्षणे ही सरकारी जागांवर टाकण्यात आली आहेत. त्यामुळे फारसे अडथळे न येता विकास झपाट्याने होणार आहे. नवीन आराखड्यानुसार मीरा-भाईंदरचे प्रवेशद्वार हे उत्तन असणार आहे.
विकास आराखड्यावर हरकती व सूचना करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या मुदतीत पालिका आयुक्त कार्यालय व नगररचना कार्यालयात हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.
खारफुटीत आरक्षण टाकू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २००६ मध्ये दिला आहे. मात्र त्यानंतरही पालिकेच्या नवीन आराखड्यात खारफुटी क्षेत्रात रहिवासी आरक्षण टाकण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी धीरज परब यांनी केला आहे.
या सोयी-सुविधांचा समावेश
उत्तनसह इतर सहा गावांत पूर्वी ३९ आरक्षणे होती. आता त्यात वाढ करून ६९ आरक्षणे दर्शवण्यात आली आहेत. यामध्ये बायोडायव्र्व्हसिटी पार्क, संयुक्त स्मशानभूमी, एज्युकेशन सेंटर, स्पोर्टस् अकादमी, चौपाटी, पार्किंग, फिल्म स्टुडिओ, पर्यटन केंद्र, औद्योगकि क्षेत्र, चार ते पाच एसटीपी प्लाण्ट, खेळाची मैदाने, उद्याने, शाळांसाठी आरक्षण, महापालिकेसाठी राखीव सहा आरक्षणे, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ असलेला ४५ मीटर रस्ता, ६० मीटर दर्शवण्यात आला आहे. तसेच अन्य रस्त्यांची रुंदीदेखील वाढवण्यात येणार आहे.