
लातूर तालुक्यातील मौजे पोहरेगाव (विठ्ठलनगर) येथील दोन व्यक्ती शेताकडून परत घराकडे येत असताना पुरात अडकले होते. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर त्यांना बाहेर सुखरूप काढले.
शिवारी सायंकाळी साडेचार वाजता शंकर धुमाळ (42) आणि बाळासाहेब शिंदे (50) हे सायंकाळी शेताकडून येत होते. पुलावर अचानक पाणी वाढल्याने दोघेही अडकले. याची माहिती कळताच अर्धे गाव नदीच्या कडेला गोळा झाले. नदीचा प्रवाह जास्त असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचायचे कसे हा प्रश्न होता. धाडस करून अनंत कदम (55) आणि ज्ञानेश्वर कदम (35) हे त्यांना पोहून बाहेर काढण्यासाठी सरसावले, पण त्यांनी सोबत नेलेली दोरी त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे वाढत्या पाण्यामुळे हे दोघेही पुराच्या पाण्यात अडकले.
यानंतर सरपंच, उपसरपंच यांनी तालुका प्रशासन मार्फत एनडीआरएफ टीम यांना भ्रमणध्वनीवरून कळविले. एनडीआरएफची टीम ही तात्काळ बीड वरून निघाली. मात्र ते पोहोचेपर्यंत उशीर होईल म्हणून गावातील भास्कर हांडगे या तरुणाने शक्कल लढवली आणि गावातील लाईट तात्काळ बंद करून विद्यूत तार तोडली. त्या तारेच्या सहाय्याने चौघांनाही सुखरूप बाहेर काढले.
लातूर तालुक्यातील मौजेय पोहरेगाव (विठ्ठलनगर) येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या चौघांना वाचवण्याचा थरार. दोर पोहोचला नाही म्हणून गावातील लाईट बंद केली अन् तार तोडून त्याच्या सहाय्याने वाचवला जीव. #MarathwadaRain #saamanaonline pic.twitter.com/CA2jj1KTeW
— Saamana Online (@SaamanaOnline) September 28, 2025
जिवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
मागील काही दिवसापासून होत असलेला अतिवृष्टीमुळे शेतकरी तसेच नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे सर्व सामाजिक संस्था, कारखाने, आस्थापना व वैयक्तिक व्यक्तींनी धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू, औषधांची मदत करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शेतकरी व नागरिकांना धान्य,कपडे,औषधे तसेच इतर जीवनावश्यक वस्तू यांची मदत करावयाची असल्यास खालील नमूद क्रमांकावर संपर्क साधून शासनामार्फत अधिकृत रित्या मदत करता येईल. संपर्क मोबाईल क्रमांक 9890084168 आहे, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.