संकटात मराठवाडा; भाजीपालाच शिल्लक राहिला नाही, पुणे विभागातून महागड्या भाजीपाल्याच्या आयातीला सुरूवात

उदय जोशी, बीड

अतिवृष्टीने संपूर्ण मराठवाड्यामध्ये हाहा:कार उडवून दिला आहे. एकट्या मराठवाड्यामध्ये 50 लाख हेक्टर शेती पाण्याखाली आहे. खरीप हंगाम तर नेस्तनाबूत झालाच, मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची शेतीही उद्धवस्त झाली आहे. चार दिवसांपासून मराठवाड्यातला भाजीपाला संपुष्टात आला आहे. आता मराठवाड्याला भाजीपाला पुरवण्यासाठी पुणे विभागातून मोठ्या प्रमाणावर आयात सुरू आहे. व्यापार्‍यांनी पुणे विभागातून खरेदी करून जिल्ह्या जिल्ह्याला भाजीपाला पुरवण्याचे काम हाती घेतले आहे. सहाजिकच या भाजीपाल्याच्या किंमती गगनाला भिडणार्‍या आहेत.

एरव्ही पुणे, मुंबईसारख्या मेट्रो शहरांना रोज ताजा आणि स्वच्छ दर्जेदार भाजीपाला पुरवणार्‍या मराठवाड्याची अतिवृष्टीने अशी दुर्दशा झाली आहे. संपूर्ण मराठवाड्यात भाजीपाल्याची शेती नष्ट झाली आहे. आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे काढून ठेवलेला भाजीपालाही आता सडल्या गेला आहे. बटाटा शिवाय सध्या शिल्लक काही राहिलेले नाही. गाव खेड्यापासून शहरापर्यंत भाजीपाला नसल्याने कडधान्यावर भर द्यावा लागत आहे.

कालपासून पुणे विभागातून भाजीपाला मराठवाड्याला पोहच करण्याचे काम होत आहे. व्यापारी पुणे विभागातून खरेदी केलेला भाजीपाला मराठवाड्यातील जिल्ह्या जिल्ह्यात आणि तालुकास्तरावर त्यांच्या व्यापार्‍यांमार्फत विक्रीसाठी पोहच करत आहेत. सहाजिकच भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दाम तिप्पटीने भाव वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. ग्रामीण भागात तर मोठी दुर्दशा निर्माण झाली आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने संसार उद्धवस्त झाला आहे. धान्याची पोते भिजली. खायचे काय असा प्रश्न पडला असताना आता खिशात दमडी नाही. त्यामुळे मराठवाड्यावर कोसळलेल्या संकटाची मालिका मात्र थांबायचे नाव घेईना.