दिल्लीचा माजी कर्णधार बीसीसीआयचा नवीन बॉस; मिथुन मन्हास यांची अध्यक्षपदी निवड, इतिहासात झाली नोंद

दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मन्हास बीसीसीआयचे नवीन बॉस झाले आहेत. त्यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते रॉजर बिन्नी यांची जागा घेतील. तर राजीव शुक्ला यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

मिथुन मन्हास यांनी काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. त्यानंतर रविवारी 28 सप्टेंबर मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये मिथुन यांच्या नावावर अध्यक्षपदाची मोहोर उमटवण्यात आली. राजीव शुक्ला यांची उपाध्यक्ष आणि सचिवपदी निवड झाली. ए. रघुराम भट हे बीसीसीआयचे नवीन खजीनदार असतील.

दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष बनताच मिथुन मन्हास यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली. कारण सर्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणाऱ्या बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवणारे ते पहिलेच अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत.

कोण आहेत मिथुन मन्हास?

मिथुन मन्हास यांनी 1997/98 हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ते मधल्या फळीमध्ये फलंदाजी करायचे. मात्र याच काळात राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली हे संघात असल्याने मन्हास हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संघात स्थान निर्माण करू शकले नाहीत. विराट कोहली दिल्लीकडून खेळत असताना मन्हास हे संघाचे कर्णधार होते.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचेही प्रतिनिधित्व केलेले आहे. 2008 ते 2010 ते दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात होते, त्यानंतर 2011 आणि 2013 चा हंगाम ते पुणे वॉरियर्सकडून खेळले आणि 2014 मध्ये ते धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईकडून खेळले. आयपीएलच्या 55 लढतीत त्यांनी 514 धावा केलेल्या आहेत. त्यांनी प्रथमश्रेणीच्या 157 लढतीत 45 च्या सरासरीने 9714 धावा केल्या आहेत. यात त्यंच्या 27 शतकांचा समावेश आहे. त्यांनी लिस्ट एचे 130 सामनेही खेळले असून यात 4126 धावा केल्या आहेत, तर 91 टी-20 लढतीत 1170 धावा केलेल्या आहेत.