Ahilyanagar news – जामखेडला पावसानं झोडपलं; घराची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू, 9 जनावरं दगावली

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावं, वाड्या, वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे घरांच्या भिंती ओल्या झाल्याने कोसळत आहेत. तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे भिंत अंगावर कोसळून एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला, तर 9 जनावरे दगावली आहेत.

पिंपळगाव उंडा येथे किसन गव्हाणे व पारूबाई किसन गव्हाणे हे दाम्पत्य पत्र्याच्या घरात झोपले होते. सतत पाऊस चालू असल्याने शेजारच्या जुन्या इमारतीचा भिंतीचा भाग पत्र्याच्या घरावर कोसळला. याखाली दबल्याने पारूबाई (वय – 75) गंभीर जखमी झाल्या. त्यांना ताबडतोब जामखेड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात डॉ. शशिकांत शिंदे यांनी रात्रीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

जामखेड-तुळजापूर वाहतूक बंद

जामखेड तालुक्यात सर्वच मंडळात पावसाने सरासरी ओलांडली आहे. धरणे, नद्या, ओढे यांचे पाणी शेतात शिरले असून उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. खैरी नदीला पूर आला असून दरडवाडीचा पूल बंद आहे. तसेच आनंदवाडीचा पूल बंद आहे. यामुळे जामखेड-तुळजापूर वाहतूक मार्ग बंद आहे.

नऊ जनावरे दगावली

लेहनेवाडी येथील शेतकरी शरद प्रभाकर पवार यांच्या 7 शेळ्या मृत्यूमुखी पडल्या तर भवरवाडी येथील पोपट अण्णा शिंदे यांची गाय वाहून गेली. मोहा येथील कैलास सजगणे यांची 1 मेंढी ओढ्यात वाहून गेली आहे. अनेक घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांत पाणी शिरल्याने संसरोपयोगी साहित्याचा चिखल झाला आहे.

जनजीवन विस्कळीत

पिंपळगाव उंडा, सावरगाव, घोडेगाव, खुरदैठण, मोहरी, राजुरी, शिऊर, मुंजेवाडी, वंजारवाडी, तरडगाव, वाघा यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली तर अनेक घरात पाणी शिरले असल्याने संसारोपयोगी वस्तुंचे नुकसान झाले आहे. जवळके येथील हनुमान मंदिर पाण्यात गेले असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.

अहिल्यानगरमध्ये साडेतीन तासांच्या मुसळधार पावसाने दाणादाण, गोदावरीतुन 13 हजार क्युसेसने विसर्ग सुरू