पोलीस हवालदारासह दहा आरोपींची सुटका, एमआयडीसी पोलिसांना चपराक

कोटयवधी रुपयांच्या सोन्याच्या कच्रयाच्या चोरी प्रकरणातून अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलिस हवालदार संतोष राठोड यांच्यासह दहा आरोपींची निर्दोष सुटका केली. एमआयडीसी पोलीस या चोरीचे सबळ पुरावे सादर करु शकले नाहीत, असा ठपका ठेवत न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली.

अंधेरी अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी जी. डी. निर्माळे यांनी हा निकाल दिला. पोलीस हवालदार संतोष राठोड यांच्यासह विपूल चामबारीया, लक्ष्मण डांडू, शंकर येशू, राजेश मारपक्का, विकास चांवाडी, मुन्नाप्रसाद खैरवार, डीमंत चौहान, इरफान मुलानी व पंकज गौड यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

या चोरीचा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. सीसीटीव्ही व अन्य पुरावे विश्वासार्ह नाहीत. या आरोपींचा गुन्हा पोलीस सिद्ध करू शकले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

z कोरोनामध्ये अंधेरी येथील महाकाली रोडवरील औद्योगिक विभागातील सोना ओवरसिज येथे पंधरा लाखांच्या सोन्याच्या कच्रयाची चोरीचा आरोप झाला. पुढे जाऊन तपासात ही चोरी तब्बल सात कोटींची असल्याचे समोर आले. एमआयडी पोलिसांनी 22 एप्रिल 2020 रोजी या गुन्हा नोंदवला.

खोटे साक्षीदार

नऊ लाखांच्या चोरीचा आरोप पोलीस हवालदार राठोड यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र त्यांच्याविरोधात दोन खोटे साक्षीदार सरकारी पक्षाने सादर केल्याचे अॅड. मंगेश देशमुख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने राठोड यांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली.