पावसाचा रुद्रावतार! ठाणे, पालघर, रायगडात दाणादाण, भातशेतीचा चिखल, मासेमारी बंद, जनजीवन विस्कळीत

गेल्या काही दिवसांपासून पावसाने मराठवाड्यात थैमान घातले असतानाच त्याने आपला मोर्चा आता ठाणे, पालघर व रायगडकडे वळवला आहे. तीनही जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्रीपासूनच धुवांधार पावसामुळे दाणादाण उडाली असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अचानक बदललेले हवामान याचा मोठा फटका मच्छीमारांना बसला असून मासेमारी बंद झाली आहे. त्यामुळे हजारो बोटींनी नांगर टाकले आहे, तर प्रवासी बोट वाहतूकही ठप्प झाली. रुद्रावतार धारण केलेल्या पावसाने भातशेतीचा अक्षरशः चिखल केला असून ऐन सणासुदीच्या काळात बळीराजावर मोठे संकट उभे ठाकले आहे.

ठाण्यात भिंती, झाडे कोसळली
ठाण्यातील सरस्वतीनगरी सोसायटी व टिकुजिनीवाडी येथील नीळकंठ ग्रीन सोसायटीजवळ संरक्षक भिंत कोसळली. दिव्यात भलेमोठे झाड पडून दोन रिक्षांचे नुकसान झाले. ढोकाळी नाका येथेही वाऱ्याच्या माऱ्यामुळे लोखंडी कमान पडली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पालघर जिल्ह्यात आज शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नद्या ओसंडून वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भातशेतीचे प्रचंड नुकसान
रायगडच्या कर्जत तालुक्यातील कळंब, गरुडपाडा, पोशीर, जामरुख, खांडस येथील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाला असून शेतकयांच्या कष्टाची माती झाली आहे. पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पालघर जिल्ह्याच्या वाडा व जव्हार तालुक्यातदेखील भाताचे पीक आडवे झाले असून शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत हे नुकसान झाले. जव्हारमधील नागली व उडीद ही पिकेही हातची जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

भातसा धरणासह तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खर्डी बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड झाले असून कानवी नदीच्या पाण्याने चटरीव गावाला वेढा दिला आहे. येथील घरे व मंदिरेदेखील पाण्याखाली गेल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्याला उद्या सोमवारी ऑ रेंज तर मंगळवारी येलो अलर्टचा इशारा दिला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील पोसरी व पेज नदी दुथडी भरून वाहत असून दहिवली पुलावरदेखील पाणी आल्याने हा मार्ग बंद ठेवला आहे. कळंब येथील स्मशानभूमी पाण्यात बुडाली आहे. वसई पूर्वेतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून त्यात अनेक वाहने अडकून पडली आहेत. हायड्रा क्रेनच्या सहाय्याने काही वाहनांना बाजूला काढावे लागले.

वसईत वीजपुरवठा खंडित
वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे वसईतील अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले. घरांवरील पत्रे उडाली. त्यामुळे शहरातील काही भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. विरार, नालासोपारा, तुळींज, वसई रेल्वे स्थानक, बंगली नाका, समतानगर, नायगाव आदी भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

कल्याण, डोंबिवली, शहापूर, मुरबाडलाही झोडपले
आभाळ फाटल्यागत कोसळणाऱ्या पावसाने कल्याण, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, भिवंडीलाही झोडपून काढले. धसईतील जिल्हा परिषदेच्या शाळेची संरक्षक भिंत कोसळली, तर भातसा नदीवरील पूल, पिवळी-कांबारे, वासिंद-भातसई या मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे वाहतूक बंद ठेवली आहे.