
शनिवारी उशिरा रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सफाळे परिसरात मोठा अनर्थ टळला. कल्याण, डोंबिवलीतून नवदुर्गा दर्शनासाठी आलेल्या महिलांची बस गेरूच्या ओहोळाजवळ पुराच्या पाण्यात अडकून बंद पडली. प्रयत्न करूनही बस सुरू होत नव्हती. त्यातच परिसरात पुराचे पाणी क्षणाक्षणाला वाढत असल्याने सर्वांनीच देवाचा धावा केला. याबाबत माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, प्राणिमित्र यांच्या मदतीने रात्री उशिरा सर्व ४५ महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली.
कल्याण-डोंबिवली परिसरातील महिला दरवर्षीप्रमाणे यंदाही कुर्लाई देवीच्या दर्शनासाठी सफाळे येथे आले होते. दर्शन करून परत जात असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे गेरूच्या ओहोळावर पाणी साचले. त्यावेळी विजेच्या कडकडाटासह वीजपुरवठाही खंडित झाला होता. अंधारात पुराचे पाणी वाढल्याने बस रस्त्यात अडकली आणि तिचे इंजिन बंद पडले. त्यामुळे प्रवासी घाबरून गेले आणि काही काळ परिस्थिती गंभीर झाली. घटनेची माहिती मिळताच सफाळेचे उपसरपंच राजेश म्हात्रे, प्राणिमित्र, स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जेसीबीच्या सहाय्याने काही तासांच्या प्रयत्नानंतर बस सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. महिलांना तत्काळ बसमधून सुरक्षित बाहेर काढून ग्रामसेवालयाच्या हॉलमध्ये नेण्यात आले.
दुसऱ्या वाहनाने पहाटे कल्याण, डोंबिवलीत
सफाळे ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांच्या मुक्कामाची व्यवस्था ग्रामसेवालयात करण्यात आली. त्यांना रात्री उशिरा चहा-बिस्किटे तसेच जेवण देण्यात आले. अडकलेल्या बसचे स्टार्टर पूर्णपणे खराब झाल्यामुळे ती पुन्हा सुरू करता आली नाही. परिणामी बस नायरा पेट्रोल पंपाजवळ उभी करण्यात आली. रविवारी पहाटे दुसरी बस मागवून सर्व महिला प्रवाशांना सुखरूप त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.