महामार्गावरील मोकाट गुरे प्रांत कार्यालयात सोडू; डहाणूतील किसान सभेचा इशारा

जव्हार राज्य मार्गासह डहाणूतील विविध ठिकाणी मोकाट गुरांचा सुळसुळाट वाढला आहे. या मोकाट जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून स्थानिक नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या गुरांबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरच या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केली नाही तर ही गुरे प्रांत कार्यालयात आणून सोडू, असा इशारा किसान सभेने दिला आहे.

डहाणू स्टेशन, इराणी रोड, जव्हार रोड, सरावली नाका, पारनाका, कैनाड रोड, डहाणू गाव, रामवाडी, आशागड, गंजाड, चारोटी, कासा यांसह शहरातील अन्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. ही गुरे रात्रीच्या वेळी रस्त्यावर ठाण मांडून बसतात. पावसामुळे सगळीकडे चिखल होत असल्याने ही जनावरे रस्त्यांवर येऊन बसत असल्याने रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी गेल्या वर्षी पंचायत समिती व नगर परिषदेने सूचना फलकांच्या मदतीने जनजागृती करत गुरांच्या मालकांना नोटिसादेखील बजावल्या होत्या. मात्र त्यानंतरही काही बदल झाला नाही. ही मोकाट जनावरे शेतात घुसून हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचा फडशा पाडत असल्याने बागायतदार मेटाकुटीला आला आहे.