
वाडा नगरपंचायत प्रशासनाने केलेली करवाढ ही अन्यायकारक आहे. त्यामुळे ती तातडीने मागे घेण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीने नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी मनोज पष्टे यांची भेट घेऊन त्यांना करवाढ कमी करण्यासाठी निवेदन दिले आहे.
वाडा नगरपंचायत ही नव्याने स्थापन झालेली व दुय्यम दर्जाची ग्रामपंचायत असून प्रशासनाने मालमत्ता व दिवाबत्ती करासोबतच वृक्ष कर, शिक्षण कर, रोजगार हमी कर, अग्निशमन कर अशा अतिरिक्त करांचीही वाढ केली आहे. या करामुळे नागरिक व व्यापारी यांच्या करामध्ये अवाढव्य वाढ झालेली आहे. अचानक झालेल्या करवाढीमुळे शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. नगरपंचायतीचा दर्जा पाहता व ग्रामीण भागाचा विचार न करताच करवाढ केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.