
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिले आहे. भाजपच्या विद्यार्थी संघटनेचे (ABVP) माजी नेते प्रिंटू महादेव यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. याप्रकरणी वेणुगोपाल यांनी महादेव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर कारवाई झाली नाही, तर विरोधी पक्षनेत्यांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराला सरकारचा छुपा पाठिंबा आहे असे मानले जाईल, असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
वेणुगोपाल यांनी आपल्या पत्रात भाजपचे नेते प्रिंटू महादेव यांच्या विधानाबद्दल लिहिताना त्याचा उल्लेख ‘धक्कादायक आणि भयंकर’ असा केला आहे. ते म्हणाले की, महादेव यांनी राहुल गांधींना जीवे मारण्याची उघड धमकी दिली आहे. प्रिंटू महादेव हे भाजपचे अधिकृत प्रवक्ते असून, त्यांनी एका मल्याळम वृत्तवाहिनीवरील चर्चेत हे विधान केले.
‘महादेव यांनी ‘राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू’ असे जाहीर विधान केले आहे. ही केवळ बोलताना झालेली चूक नाही किंवा निष्काळजीपणाने केलेले विधान नाही. ही देशातील एक प्रमुख राजकीय नेते आणि विरोधी पक्षनेत्याला थंड डोक्याने, सुनियोजित पद्धतीने आणि धक्कादायक अशी जीवे मारण्याची धमकी आहे’, असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘सत्तेत असलेल्या पक्षाचा अधिकृत प्रवक्ता अशी विषारी विधाने करत असेल, तर यामुळे केवळ राहुल गांधींच्या जीवाला धोका नाही, तर आपल्या संविधानाला, कायद्याच्या राज्याला आणि प्रत्येक नागरिकाला मिळणाऱ्या मूलभूत सुरक्षा हमीला देखील धक्का बसतो’.
राहुल गांधींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या CRPF नेही त्यांच्या सुरक्षेला धोका असल्याबद्दल अनेक पत्रे लिहिली आहेत, असे वेणुगोपाल यांनी सांगितले.
त्यांनी असाही आरोप केला की, भाजपच्या समर्थकांनी किंवा त्यांच्याशी संबंधित विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल गांधींना जीवे मारण्याच्या धमक्या आणि हिंसाचाराचे आवाहन करणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत.
वेणुगोपाल यांनी अमित शाह यांना विचारले, ‘तुमचा पक्ष आणि सरकार कशासाठी उभे आहे, हे स्पष्ट करण्याची जबाबदारी आता तुमची आहे. तुम्ही गुन्हेगारी धमकी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि हिंसाचाराच्या राजकारणाला उघडपणे पाठिंबा देत आहात का?’
ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींना आपल्या हक्कांचे रक्षक मानणारे कोट्यवधी हिंदुस्थानी त्यांच्या जीवाला असलेल्या धोक्यामुळे खूप चिंतेत आहेत.
राहुल गांधींना दिलेली जीवे मारण्याची धमकी केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून, ते ज्या लोकशाही मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात, त्यावरही हल्ला आहे, असे वेणुगोपाल पुढे लिहितात.
‘ही धमकी केवळ एका सर्वसाधारण अशा कार्यकर्त्याची निष्काळजी टिप्पणी नाही; तर हे जाणीवपूर्वक तयार केलेल्या द्वेषाच्या विषारी वातावरणाचे लक्षण आहे, जे विरोधी पक्षनेत्याला निष्कारण हिंसाचारासाठी असुरक्षित बनवते’.
‘त्यामुळे, तुम्ही तात्काळ, निर्णायक आणि जाहीरपणे कारवाई केली नाही, तर त्याला तुमचा छुपा पाठिंबा मानले जाईल. ही बाब म्हणजे विरोधी पक्षनेत्यांविरोधात हिंसाचाराला कायदेशीर मान्यतेचा परवानाच असेल आणि केंद्रीय गृहमंत्री म्हणून तुमच्या शपथेचा भंग असेल’, असे वेणुगोपाल म्हणाले.
यापूर्वी शनिवारी केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीसन यांनीही राहुल गांधींना कथित धमकी देणाऱ्या नेत्यावर कारवाई न केल्याबद्दल राज्य सरकार आणि पोलिसांवर टीका केली.