
म्हैसाळ उपसा सिंचन योजना 100 टक्के सौरऊर्जेवर चालविण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर्मन बँकेच्या मदतीने कृष्णा खोरे महामंडळामार्फेत संख (ता. जत) येथे एक हजार कोटी रुपये खर्च करून 200 हेक्टर जागेत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला केंद्र, राज्य शासनाने मंजुरी दिली असून, नोव्हेंबरमध्ये निविदा निघणार आहे, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचा सर्वाधिक खर्च विद्युत बिलावरचा आहे. अनेकवेळा थकीत वीज बिलामुळे सिंचन योजना बंद ठेवाव्या लागल्या आहेत. वीज बिलाच्या खर्चातून सुटका करण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून म्हैसाळ उपसा सिंचन योजना 100 टक्के सौरऊर्जेवर चालविण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे.
त्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी धुळे जिह्यातील साखरी येथील सौरऊर्जा प्रकल्पांची पाहणी केली. त्या ठिकाणी तीन प्रकल्प सुरू आहेत. त्या धर्तीवर मात्र त्याहून मोठा प्रकल्प संख येथे उभारला जाणार आहे. त्यासाठी संख तलावाजवळील प्रकल्पाच्या जागेतील अतिक्रमणे हटविली आहेत. येथील काम सुरू करण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाकडून हालचाली सुरू आहेत. निविदा काढण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.
2028 मध्ये सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे म्हणाले, संख येथील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम जानेवारीपासून सुरू होईल. येत्या दीड वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. जून 2028 मध्ये म्हैसाळ योजनेचे आवर्तन सौरऊर्जेवर चालू होऊ शकते.
असा आहे सौरऊर्जा प्रकल्प
- संख येथील 200 हेक्टर जागेत सौरऊर्जा प्रकल्प होणार सौरऊर्जा प्रकल्प खर्च
- 1000 कोटी रुपये
- म्हैसाळ योजनेच्या पंप हाऊसमध्ये बदल करणे – 350 कोटी रुपये
- सौरऊर्जा प्रकल्पातून 200 मेगावॅट विजेची निर्मिती
- म्हैसाळ योजनेचे पहिले पाच टप्पे आणि विस्तारित योजनेचे दोन टप्पे सौरऊर्जेवर चालणार आहेत.
पंचवीस वर्षे पूर्ण क्षमतेने प्रकल्प चालणार
संख येथील प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्प 25 वर्षे पूर्ण क्षमतेने चालेल, नंतर त्याची क्षमता 75 टक्क्यांवर येईल. म्हैसाळ योजनेचे पंप या ऊर्जेवर चालवले जातील. त्यासाठी पंप हाऊसमध्ये काही बदल आवश्यक आहेत. त्याची क्षमताही वाढवली जाणार आहे. 25 वर्षांच्या काळात गुंतवणुकीच्या चौपटीने वसुली होईल, असे अपेक्षित आहे, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले. सौरऊर्जेवर प्रकल्प सुरू झाल्यानंतर शेतकऱयांना पाणीपट्टीही कमी आकारणी होणार आहे.
म्हैसाळ योजनेला 96 मेगावॅट विजेची गरज
जर्मन बँक आणि केंद्र सरकारच्या निधीतून सौरऊर्जा प्रकल्प होणार आहे. त्यादृष्टीने जर्मन बँक आणि कृष्णा खोरे महामंडळामध्ये करारही झाला आहे. सध्या म्हैसाळ योजनेला 96 मेगावॅट वीज लागते. सौरऊर्जेची वीजनिर्मिती रात्री होत नाही. त्यामुळे दुप्पट क्षमतेचा प्रकल्प उभारला जात आहे. पाणी आवर्तन काळ वगळता अन्य काळात ही वीज महावितरणला विकली जाईल. त्यातून ‘पाटबंधारे’ला उत्पन्नाचे साधन मिळेल. प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च त्यातून निघेल, असा अंदाज पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी व्यक्त केला.






























































