
पहलगाम हल्ल्याचा संदर्भ वापरून ठगाने वृद्धाची फसवणूक केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) दिल्ली हे अटक करणार अशी भीती दाखवून वृद्धाच्या बँक खात्यातून 70 लाख रुपये काढले. वृद्धाने दिलेल्या तक्रारीवरून रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते परळ परिसरात राहतात. ते पूर्वी एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कामावर होते. गेल्या आठवडय़ात त्यांना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने तो एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) कंट्रोल रूम नवी दिल्ली येथून बोलत असल्याचे सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणी दिल्ली एटीएसच्या पथकाने मुंबईत छापा टाकला आहे. त्यात काही मोठे उद्योजक, प्रशासकीय अधिकारी यांचा सहभाग असल्याचे सांगितले. दहशतवाद्यांना मदत करण्याची नावे समोर आल्याचे भासवले. एक नंबर आढळून आला असून त्याचे बँक खाते आणि मोबाईल सेवा बंद केली जाणार असल्याची भीती दाखवली.
अशी केली फसवणूक
या प्रकरणाचा तपास एनआयए करणार आहे. तपास अधिकारी आयजी प्रेमकुमार गौतम हे असणार आहेत. काही वेळाने त्यांना मोबाईलवर एक व्हिडीओ कॉल आला. पोलीस गणवेशात असलेल्या व्यक्तीने तो आयजी प्रेमकुमार गौतम असल्याचे सांगितले. पहलगाम हल्ल्यानंतर आम्हाला काही माहिती मिळाली आहे. त्यात तुमचा नंबर मिळाला आहे. तसेच अरेस्ट वॉरंट निघाला असल्याची भीती दाखवली. ठगाने त्यांना फंड लिगलायझेशन करण्यासाठी 70 लाख रुपये पाठवण्यास सांगितले. कारवाईच्या भीतीपोटी त्यांनी ते पैसे पाठवले. मात्र काही वेळाने फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार केली.