
विधानसभा निवडणुकीत मीरा भाईंदरमध्ये व्होट चोरी झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ओवळा-माजिवडा आणि मीरा-भाईंदर मतदारसंघात कशाप्रकारे व्होटचोरी झाली याचा पुराव्यासह पंचनामाच काँग्रेसने आज पत्रकार परिषदेत केला. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांची नावे तीन ठिकाणी आणि दहा बाय दहाच्या गाळ्यात एकाच आडनावाचे २५ मतदार नोंद असल्याचे पुरावे यावेळी दाखवण्यात आले. काँग्रेसने केलेल्या व्होट चोरीच्या आरोपामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
व्होट चोरी, निवडणूक आचारसंहिता संदर्भातील प्रलंबीत प्रकरणे आणि गुन्हे या विषयावर मीरा-भाईंदर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. व्होट चोरी करूनच महायुती सरकार सत्तेत आल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी हेमांगी पाटील यांनी केला, तर काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष दीपक बागडी यांनी दुबार, तिबार, बोगस नावांची निवडणूक मतदार यादीच पत्रकार परिषदेत दाखवली. मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचे समर्थक रविकांत उपाध्याय यांचे मतदार म्हणून यादी क्र. १६४, मीरा रोड क्लस्टर यादी क्र. ४३७अशा दोन ठिकाणी नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे ओवळा-माजिवडा मतदारसंघातील यादी क्र. १२३ मध्येही मतदार म्हणून त्यांचे नाव आहे, तर मीरा रोडच्या पूनम सागर येथील अस्मिता उपहार सोसायटीच्या शॉप नंबर ११ मध्ये यादव आडनावाची तब्बल २५ नावे मतदार म्हणून नोंदवली गेल्याचे पुरावे यावेळी दाखवले.
दुकानाच्या पत्त्यावरील २५ मतदार गायब
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्होट चोरीचा मुद्दा देशभर उचलून धरत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. आता मीरा-भाईंदरमध्येही एका छोट्याशा दुकानाच्या पत्त्यावर तब्बल २५ मतदारांची नोंद असून तेथे कोणीही राहत नाही. हे सर्वजण गायब आहेत. त्यामुळे ही व्होट चोरीच असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसैन आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.





























































