
आशिया चषकाच्या अंतिम लढतीत हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव केला आणि ट्रॉफी जिंकली. मात्र अंतिम लढतीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने एसीसी प्रमुख मोहसीन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. याचे पडसाद एसीसीच्या बैठकीतही उमटले. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊत यांनी रोखठोक उत्तर दिले आणि हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीतून मिळालेले 1000-1200 कोटींचे उत्पन्न बीसीसीआयने हिंदुस्थानी सैन्याला द्यावे आणि हिंदुस्थानी संघाने तीन सामन्यांचे मानधन पहलगाममध्ये कुंकू पुसलेल्या 26 माताभगिनींच्या कुटुंबाला द्यावे. तरच तुमचे पाप धुवून निघेल, असे म्हटले.
हिंदुस्थान-पाकिस्तान सामना होऊ नये ही आमची भूमिका असल्यावर ते सामना खेळले काय, निकाल काय लागला यावर आम्ही बोलणार नाही. पण भाजपचे ढोंग, दुटप्पीपणा यातून बाहेर पडला. मॅच का खेळलात तुम्ही हा पहिला प्रश्न. मॅच जर खेळलात तर राष्ट्रभक्तीचे गुणगान करू नका. पाकिस्तानी संघाने मॅच फी अजहर मसूद सारख्या अतिरेक्यांनी दिले. हिंदुस्थानी संघाने काय केले? असा सवाल राऊत यांनी केला.
हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यातून बीसीसीआयला जे उत्पन्न मिळाले काही हजार कोटी ते उत्पन्न हिंदुस्थानी सैन्याला द्यावे, तर तुमचे पाप धुवून निघेल आणि हिंदुस्थानी संघाने तीन सामन्यात जे मानधन मिळाले ते त्यांनी पहलगाममध्ये 26 माता भगिनींचे कुंकू पुसले त्या कुटुंबाला द्यावे. हे होणार आहे का? नसेल तर राष्ट्रभक्तीचे बुडबुडे फोडू नका, असेही राऊत यांनी ठणकावले.
भाजपने शरद पवारांकडून शिकावं
2004 साली महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि शरद पवार कृषी मंत्री होते. त्या प्रचंड अतिवृष्टीनंतर शरद पवारांनी राष्ट्रीय आपत्ती नियोजन निधीतून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी 70 हजार कोटी आणले होते. त्यातून कर्जमाफी सुद्धा झाली. मग आता का नाही? आता तुम्ही शेतकऱ्यांवर भार का टाक आहात? राष्ट्रीय आपत्ती नियोजन निधीकडून 2004 मध्ये महाराष्ट्रासाठी 70 हजार कोटींची निधी दिला, मग 100 कोटी, 200 कोटी, 5000 मदत हा काय प्रकार चालवला आहे? बिहारमधील 75 लाख महिलांना एका रात्रीत पैसे देता, मग महाराष्ट्रातील मराठवाड्यातील, अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना तु्म्ही असे वंचित का ठेवता? देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांच्या कॅबिटने शरद पवारांकडे जावे आणि त्यांनी 2004 साली राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीकडून पैसा आणला हे समजून घ्यावे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.































































